हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर
By जितेंद्र ढवळे | Published: July 31, 2023 04:29 PM2023-07-31T16:29:23+5:302023-07-31T16:31:37+5:30
बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर निकिताने नागपुरातील मथुरादास सायन्स कॉलेजमधून बी. एस्सी. केले.
नागपूर : आपली मुले पोलिसच व्हावीत, असे बहुतांश पाेलिसांना वाटत नाही! वडिलांची दहा ते बारा तासांची ड्यूटी. कामाचा ताण पाहून पोलिस दलात सामील होण्यास त्यांची मुलेही धजावत नाहीत. मात्र, आधी बांधकाम मजूर व त्यानंतर पोलिस शिपायापासून हवालदारापर्यंत टप्पा गाठणाऱ्या नागपुरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे दिलीप उईके यांची मुलगी निकिता हिने स्पर्धा परीक्षेत दमदार यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) होण्याचा मान मिळवला आहे.
नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून एम. एस्सी. झालेल्या निकिताने पदवीचे शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवेत करिअर करण्याची खूणगाठ बांधली. आत्मविश्वासाच्या बळावर तिने २०२२ मध्ये लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा (पीएसआय) परीक्षेत राज्यात अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात महिलांमध्ये पहिला क्रमांक पटकावला.
मुलीच्या करिअरसाठी आईची तपस्या...
वडील पोलिस दलात असल्याने आई ललिता हिच्या आग्रहास्तव मुलीचे चांगले करिअर घडावे म्हणून निकिताला पाचवीच्या वर्गातच पारशिवनीच्या जवाहर नवोदय विद्यालयात टाकण्यात आलं. बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर निकिताने नागपुरातील मथुरादास सायन्स कॉलेजमधून बी. एस्सी. केले. यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून ती एम. एस्सी.ही झाली. याच काळात शिक्षक विक्रम आकरे यांच्या मार्गदर्शनात तिने स्पर्धा परीक्षेचे धडेही गिरवले. या प्रवासात आईचे मोठे योगदान असल्याचे निकिता सांगते.
जिद्द आणि चिकाटी अंगात असली तर आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पूर्ण करता येते. याच स्वप्नाचा पाठलाग मी केला. मी ज्या प्रवर्गात मोडते तिथे ज्ञानगंगा अद्यापही पूर्ण पोहोचलेली नाही. पीएसआयचे प्रशिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आता नवे टास्क निश्चित केले आहेत.
- निकिता उईके, नागपूर
बांधकाम साइटवर काम करताना वृत्तपत्र वाचून ज्ञान वाढवत पोलिस शिपाई झालो. हवालदाराची मुलगी फौजदार झाली. मुलगा प्रणव बी. एस्सी. (ॲग्री) झाल्यानंतर यूपीएससीचे शिखर गाठण्यासाठी परिश्रम करतोय. आणखी काय हवंय?
- दिलीप उईके, हवालदार, कोतवाली पोलिस ठाणे, नागपूर