अहो आश्चर्यम! नागपूरच्या मृत व्यक्तीने दीड वर्षानंतर गडहिंग्लज गाठले अन् कोरोनाची लस घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2022 11:30 PM2022-12-05T23:30:00+5:302022-12-05T23:30:02+5:30
Nagpur News दीड वर्षापूर्वी निधन झालेल्या व्यक्तीने कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लस घेतल्याचा मेसेज आल्याने त्या व्यक्तीचे कुटुंबिय चक्रावून गेले.
नरेश डोंगरे
नागपूर : दोन वर्षांपूर्वी मृत झालेले नागपुरातील एक आजोबा आज कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचले. तेथे त्यांनी एका सरकारी रुग्णालयातून कोविडची लस घेतली. त्यांच्या लसीकरणाचा मेसेज आज त्यांच्या नातेवाईकाच्या मोबाइलवर धडकला आणि काही वेळेसाठी त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या कथित चमत्कारातील व्यक्तीचे नाव शिवाजी हिरामन डांगे आहे. ते नागपुरातील लालगंज , मेहंदीबाग परिसरात राहत होते.
डांगे सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून काम करायचे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांचे दि. २७ जुलै २०२१ला निधन झाले. घरच्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. नंतर पुढचे कार्यक्रम झाले. महानगरपालिकेच्या जन्म, मृत्यू नोंदणी कार्यालयाने डांगे यांच्या मृत्यूची नोंद करून तसे प्रमाणपत्रही नातेवाइकांना दिले. आता या गोष्टीला १६ ते १७ महिने झाले. डांगे आजोबांच्या स्मृती धूसर होत असताना आज अचानक डांगे यांचा नातू निखिल याच्या मोबाइलवर एक मेसेज धडकला. शिवाजी हिरामन डांगे यांच्या कोव्हॅक्सिनचा पहिला डोस यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, त्याचे प्रमाणपत्र हवे असेल तर शासकीय संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करता येऊ शकेल, असे इंग्रजीतील त्या मेसेजमध्ये नमूद आहे. या मेसेजमुळे निखिलच नव्हे तर डांगे यांच्या अन्य नातेवाइकांनाही भूकंपासारखा धक्का बसला. त्यांनी लगेच संकेतस्थळावर जाऊन हिरामन डांगे यांच्या कोव्हॅक्सिनचे प्रमाणपत्र तपासले अन् डांगे कुटुंबीयांना एकावर एक धक्के बसत गेले. प्रमाणपत्रात नमूद असलेल्या माहितीनुसार, शिवाजी हिरामन डांगे यांनी व्हॅक्सिनचा पहिला डोस सोमवार, दि. ५ डिसेंबर २०२२ला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे घेतला. त्यांचे लसीकरण जी. ए. भुलाम्बर यांनी केले. त्यांच्या पुढच्या लसीकरणाची तारीख २ ते १६ जानेवारी २०२२ असल्याचेही या प्रमाणपत्रातून सांगण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त व्यक्तींना आता नवनव्या व्याधी घेरत असून, त्यामुळे संबंधित व्यक्ती तसेच नातेवाईक आफ्टर कोरोना इफेक्टमुळे रडकुंडीला आले आहेत. मात्र, या प्रकरणात कोरोनाचा नव्हे तर कोरोनाच्या लसीकरणाचा ईफेक्ट आहे आणि या चमत्कारामुळे डांगे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक अक्षरश: चक्रावले आहेत.
हसावे की रडावे, कळेचना !
दीड वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतला. ते आज राज्याच्या एका टोकावर असलेल्या जिल्ह्यात जाऊन कोविडची लस कशी घेऊ शकतात, असा डांगे कुटुंबीयांना आणि त्यांच्या नातेवाइकांना प्रश्न पडला आहे. या चमत्कारिक प्रकारामुळे त्यांची 'हसावे की रडावे', अशी स्थिती झाली आहे.