डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे देणे भोवले; ‘ऑनलाईन’ औषधे मागविणाऱ्या व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:48 PM2023-06-12T22:48:56+5:302023-06-13T17:25:12+5:30
Nagpur News ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरून औषधे मागविणाऱ्या आजारी व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक झाली. संबंधित व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे दिले. उर्वरित पैसे परत मागण्यासाठी गुगलवरून क्रमांक शोधणे त्यांना महागात पडले.
नागपूर : ‘ऑनलाईन’ संकेतस्थळावरून औषधे मागविणाऱ्या आजारी व्यक्तीची चार लाखांनी फसवणूक झाली. संबंधित व्यक्तीने डिलिव्हरी बॉयला चुकीने जास्त पैसे दिले. उर्वरित पैसे परत मागण्यासाठी गुगलवरून क्रमांक शोधणे त्यांना महागात पडले. राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुरेशचंद्र लिंगय्या बोर्हा (वय ६५, नाईक ले आऊट) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुरेशचंद्र यांना उजव्या डोळ्याने काहीच दिसत नाही व डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांनी ७ जूनला ॲमेझॉनवरून आवश्यक ती औषधे मागविली होती. बाराशे रुपयांऐवजी त्यांनी चुकीने डिलिव्हरी बॉयला अडीच हजार रुपये दिले. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक शोधला व जो क्रमांक आला त्यावर फोन करून हा प्रकार सांगितला. त्यांनी उर्वरित रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली व ते सातत्याने फॉलोअप घेत होते.
१० जूनला त्यांना एका व्यक्तीचा फोन आला व तो कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगत पैसे परत मिळतील असे सांगितले. त्याने सुरेशचंद्र यांना बॅंक खात्याचे तपशील मागितले. समोरील व्यक्तीने त्यांना एनीडेस्क हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले व त्याचा कोड मागितला. केअरटेकर अपर्णाच्या मदतीने सुरेशचंद्र यांनी प्रक्रिया केली व काही वेळातच त्यांना एसबीआयच्या कस्टमर केअरमधून दोन वेळा दोन लाख रुपये वळते झाल्याचे सांगण्यात आले. सुरेशचंद्र यांनी समोरील व्यक्तीला फोन केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत फोन कापला. त्यानंतर फोन स्वीच ऑफच दाखवत होता. अखेर सुरेशचंद्र यांनी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.