डांबर ठेकेदारांच्या लॉबीमुळे हॉटमिक्स प्लॅण्टचा विकास थांबला; नागपूरमधील लोकांची भावना
By मंगेश व्यवहारे | Published: October 8, 2023 09:55 PM2023-10-08T21:55:00+5:302023-10-08T21:55:16+5:30
दरवर्षी रस्त्याच्या डांबरीकरणावर २०० कोटीचा खर्च
मंगेश व्यवहारे, नागपूर: महापालिकेचा हॉटमिक्स प्लॅण्ट हा सर्वात महत्वाचा विभाग असतानाही उपेक्षित ठरतो आहे. शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी सर्वात पहिले हॉटमिक्स प्लॅण्ट आठवतो, पण त्याच्या सक्षमिकरणासाठी कुठलाही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही. कारण डांबरी रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांची लॉबी अडसर ठरत आहे. जर मनपाचा हॉटमिक्स प्लॅण्ट सक्षम झाला तर रस्ते बांधकामासाठी वारंवार काढण्यात येणारे टेंडर सहज कमी होतील.
जेट पॅचर व इंस्टा पॅचर मशीनला किरायाने घेण्याची गरज पडणार नाही. आता तर हॉटमिक्स विभागाला लागणारे मनुष्यबळही कंत्राटी आहे. एकुणच डांबर लॉबीमुळे हॉटमिक्स विभागाकडे दूर्लक्ष होत आहे. दरवर्षी २०० कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा रस्त्याच्या डांबरीकरणावर व रस्ते सुधारण्यावर खर्च होतो.
नागपूर शहरात ३५५० किलोमीटरचे रस्त्यांपैकी २४०० किमीचे रस्ते मनपाच्या अखत्यारीत येतात. या रस्त्यांवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने खड्डे पडतात. मनपा जवळ सक्षम हॉटमिक्स प्लॅण्ट नसल्याने खड्डे भरतांना अडचणी जाते. जेट पॅचर व इंस्टा पॅचरवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जाते. कंत्राटी कामगारांना हॉटमिक्स प्लॅण्टवर ठेवण्यात आले आहे. विभागाचे वाहने देखील जूनाट झाले आहे. जर या विभागाला सक्षम केल्यास मनपाचा डांबरीकरणावर होणारा खर्चच अर्धा होईल. त्यातून मनपाचे कोट्यावधी रुपये वाचतील.
हिंगणा येथील हॉटमिक्स विभागाच्या २२ वर्ष जुन्या प्लॅण्टच्या जागी नवीन प्लॅण्ट लावण्यासाठी काही वर्षापूर्वी पस्ताव तयार केला होता. परंतु तो प्रस्ताव कागदावरच राहिला. पुन्हा एकदा विभागाने डीएम-६० कॅटेगिरीचा प्लॅण्ट साकारण्यासाठी हॉटमिक्स विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. १.३८ कोटीमध्ये हा प्लॅण्ट तयार होवू शकतो. मनपाचा हिंगणा येथे ७ एकरमध्ये हॉटमिक्स प्लॅण्ट आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्तही प्रकाशित केले आहे. पहिले १२० डीएम क्षमतेचा प्लॅण्ट साकारण्यात येणार होता. परंतु त्यातही कपात करून प्लॅण्टची क्षमता अर्ध्यावर आणण्यासाठी विभागावर दबाव टाकण्यात येत आहे.
गुणवत्ताही दर्जेदार
हॉटमिक्स विभागाकडून करण्यात आलेल्या सुधार कामांची गुणवत्ता दर्जेदार आहे. खड्डे बुजविण्याचे काम असो की डांबरीकरण विभागातर्फे नियमानुसार गिट्टी व डांबर मिळविण्यात येत असल्याने डांबरीकरणाची गुणवत्ता उत्कृष्ट होते. हॉटमिक्स प्लॅण्ट द्वारे बुजविण्यात आलेले खड्डे बराच काळ उखडत नाही. तर जेट पॅचर व इंस्टा पॅचरचे काम टिकावू नसल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी बरेचदा केला आहे.