दीक्षाभूमीची जागा भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची - भीमराव आंबेडकर
By आनंद डेकाटे | Published: July 5, 2024 08:51 PM2024-07-05T20:51:18+5:302024-07-05T20:51:36+5:30
दीक्षाभूमी स्मारक समिती बरखास्त करा
नागपूर : दीक्षाभूमीची मालकी ही स्मारक समितीची नाही. समितीकडे केवळ स्मारक बांधण्याचीच जबाबदारी होती. दीक्षाभूमीची जागा ही भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची असून यासंदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, एनआयटीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्या सुनावणीला मी स्वत: पुराव्यासह हजर राहणार आहे. स्मारक समितीला ‘ब्रीच ऑफ ट्रस्ट’ अंतर्गत दीक्षाभूमी सांभाळायला दिली होती. त्यात अपयशी ठरल्याने धर्मदाय आयुक्तांची भेट घेऊन समितीच बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
दीक्षाभूमीवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भीमराव आंबेडकर यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी परिसरातील ज्या भूमिगत पार्किंगच्या कामाचीही पाहणी केली. त्यानंतर पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली शेवटची क्रांती म्हणजे धम्मक्रांती होय. याच दीक्षाभूमीत त्यांनी ती ऐतिहासिक क्रांती केली. त्यामुळे त्याची छेडखानी आम्ही होऊ देणार नाही.
स्मारक समितीतील लोक मग्रुर आहेत. लोकांशी संवाद साधत नाही. दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला येथील खोदकामाला अनेक दिवसांपासून लोकांचा विरोध होता. परंतु कुणी ऐकायलाच तयार झाले नाही. त्यामुळे लोकांनी आंदोलन केले. आंदोलन शांततेत सुरू होते. परंतु, राजकीय पक्षाचे नेते असलेल्या समिती सदस्यांच्या कार्यकर्त्यांनीच जाळपोळ करून वातावरण खराब केल्याचा आरोपही भीमराव आंबेडकर यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे पद्माकर गणवीर, भीमराव फुसे, वंचित बहुजन आघाडीचे राहुल दहीकर आदी उपस्थित होते.
भूमिगत पार्किंग मोठ्या षडयंत्राचा भाग
दीक्षाभूमीवर ओबीसींसह अल्पसंख्याक समाजही मोठ्या संख्येने धम्मचक्र प्रवर्तन दिनी हजेरी लावतात. ती संख्या कमी करण्यासाठी षड्यंत्र रचून भूमिगत पार्किंगचा घाट रचला जात आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनी लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. नुकत्याच हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे तर घडवायची नाही ना? अशी शंकाही भीमराव आंबेडकर यांनी उपस्थित केली.
- भीमसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या, जागा पूर्ववत करा
१ जुलै रोजी दीक्षाभूमीवर झालेले आंदोलन हे उत्स्फुर्त होते, त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लावलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे. तसेच येथील खोदकाम केलेली जागा तातडीने पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणीही भीमराव आंबेडकर यांनी केली. दीक्षाभूमीवरील जागा १५ दिवसात पूर्ववत समतल न केल्यास स्मारक समितीच्याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.