गावातच होणार रोगावर इलाज अन् शून्य खर्चात; जि.प.च्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिर आयोजित करणार
By गणेश हुड | Published: January 25, 2024 06:37 PM2024-01-25T18:37:32+5:302024-01-25T18:38:17+5:30
खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात.
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येण्याची गरज भासू नये, त्यांना गावातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या सर्कलनिहाय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर असल्याने अनेक रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. त्यामुळे सेस फंडातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या चमूत मेयो, मेडिकल, खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश राहणार आहे. जिल्हा परिषदेचे ५८ सर्कल आहेत. प्रत्येक सर्कलमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष व आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी दिली.
आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविली जाते; परंतु ती पुरेशी नाही. काही आरोग्य केंद्रात साहित्याचा अभाव असल्याने रुग्णांना शहरात धाव घ्यावी लागते; मात्र शहरातील नामांकित डॉक्टरांचे शुल्क त्यांच्या आवाक्याबाहेर असते. याचा विचार करता आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिबिरात कान-नाक-घसा रोगतज्ज्ञ यांच्यासह नामांकित डॉक्टर सहभागी होणार आहेत. एक्स-रे मशीन, ईसीजी मशीनसह इतरही साधनसामग्री उपलब्ध राहणार आहे. नुकतेच नागपूर ग्रामीणमध्ये एक शिबिर पार पडले. आता मौदा येथे शिबिर होईल, २ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. आरोग्य सुविधांची आवश्यकता विचारात घेता आरोग्य विभागाला अधिक निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.