चहा दिला नाही म्हणून डॉक्टरने अर्ध्यावरच सोडल्या शस्त्रक्रिया, रुग्णांची वाताहात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:34 PM2023-11-07T12:34:28+5:302023-11-07T12:35:34+5:30

भूल दिलेल्या ४ महिला शस्त्रकियेसाठी ताटकळल्या : उपाध्यक्षांनी गठित केली चौकशी समिती

The doctor left half of the family planning surgery because he did not give tea! shocking incident in nagpur dist | चहा दिला नाही म्हणून डॉक्टरने अर्ध्यावरच सोडल्या शस्त्रक्रिया, रुग्णांची वाताहात

चहा दिला नाही म्हणून डॉक्टरने अर्ध्यावरच सोडल्या शस्त्रक्रिया, रुग्णांची वाताहात

नागपूर :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत नागरिकांना सर्दी-तापापासून ते बाळंतपण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर चहा न मिळाल्याने डॉक्टर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची संतापजनक घटना घडली. याची गंभीर दखल घेत जि.प.च्या उपाध्यक्ष व आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती मार्फत चौकशी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कुटुंब नियोजन शल्यक्रियेसाठी आठ महिलांना बोलावण्यात आले होते. यातील लक्ष्मी अमोल रावते, रेश्मा चेतन दत्तघाये, प्रतिभा नरेंद्र बोंद्रे व नम्रता शैलेश पटले या महिलांच्या शल्यक्रिया करण्यात आल्या. तर, भारती नितेश कानतोडे, प्रतिमा प्रमोद बारई, करिष्मा श्रीधर राजू, सुनीता योगेश झांजोडे या महिलांना शस्त्रक्रियेसाठी भुलीचे इंजेक्शन दिले होते. परंतु, वेळेवर चहा न मिळाल्याने संतापलेले डॉ. भलावी चक्क ऑपरेशन सोडून निघून गेले.

हा प्रकार लक्षात येताच प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच खळबळ उडाली. ज्या महिलांच्या शल्यक्रिया शिल्लक होत्या, त्यांच्या नातेवाइकांना याची माहिती मिळताच, त्यांनी जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल व सरपंच माधुरी वैद्य यांना माहिती दिली. या दोघीही आरोग्य केंद्रात दाखल होताच, त्यांच्याही हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी लगेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केल्याने अनर्थ टळला. 

चौकशी समितीत जि.प.चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन हेमके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत व विस्तार अधिकारी बुटे आदींचा समावेश आहे. समितीला तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करावयाचा आहे.

Web Title: The doctor left half of the family planning surgery because he did not give tea! shocking incident in nagpur dist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.