चहा-बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रकिया सोडून गेले; चौकशी समितीचा २ डॉक्टरांवर ठपका

By गणेश हुड | Published: December 9, 2023 02:30 PM2023-12-09T14:30:33+5:302023-12-09T14:31:01+5:30

दोन्ही डॉक्टरांना जबाबदार धरण्यात यावे, असे मत चौकशी  समितीने अहवालात व्यक्त केले आहे. 

The doctor left the surgery for want of tea and biscuits; Inquiry committee blames two doctors | चहा-बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रकिया सोडून गेले; चौकशी समितीचा २ डॉक्टरांवर ठपका

चहा-बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रकिया सोडून गेले; चौकशी समितीचा २ डॉक्टरांवर ठपका

नागपूर :  मौदा तालुक्यातील खात प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिला शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु, डॉक्टरला चहा-बिस्कीट न मिळाल्याने ते शस्त्रक्रिया न करता निघून गेले होते.  या प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित तीन सदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे.  अहवालात शस्त्रक्रीया न करता निघून गेलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजराम भलावी यांच्यासोबत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.  आशिष बैनलवार यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९, मधिल नियमातील तरतुदीनुसार  ठपका ठेवण्यात यावा,  दोन्ही डॉक्टरांना जबाबदार धरण्यात यावे, असे मत चौकशी  समितीने अहवालात व्यक्त केले आहे. 

चहा -बिस्कीट न मिळाल्याने शस्त्रक्रीया सोडून डॉक्टर निघून गेल्याची घटना खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली होती. या बाबतचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रकाशित केले होते. याची दखल घेत आरोग्य सेवा उपसंचालकांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. प्रमोद एम. गवई, सहायक संचालक(आरोग्य ) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. समितीत  सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ए.एस. इनामदार(जि.प.) आणि प्रशासकीय अधिकारी  के  टी.सी. चाचरे यांचा समावेश होता.  चौकशी समितीच्या अहवालात खात येथील घटनेसाठी  डॉ. तेजराम भलावी व डॉ.  आशिष बैनलवार यांना जबाबदार धरले आहे.
 भलावी यांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे शासकीय आरोग्य सेवेवर अवलंबुन असलेल्या गरीब व गरजू रुग्णांना वेठीस धरल्यामुळे मानसिक व शारीरीक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे जनमानसात आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होऊन सार्वजनिक आरोग्य सेवेवरील विश्वास कमी होण्यास कारणीभुत आहेत. वरिष्ठ व नियंत्रण अधिकारी यांनी राजपत्रित वैद्यकिय अधिकारी पदाच्या जबाबदारीची जाणीव करुन दिल्याने डॉ. तेजराम भलावी पुन्हःश्व शिबीराचे ठिकाणी येऊन उर्वरित शस्त्रक्रिया पूर्ण केल्यामुळे पुढील गुंतागुत झालेली नाही.कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर आयोजनाची संपूर्ण जबाबदारी डॉ. आशिष बैनलवार यांची होती.  त्यांनी आवश्यक दक्षता घेणे आवश्यक होते. त्यामुळे दोन्ही डॉक्टरांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

सभापतींनी दिले होते चौकशीचे आदेश

जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी (जि..प.) यांनी सादर केला होता. यात वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजराम भलावी यांना जबाबदार धरले होते. परंतु या चौकशी अहवालाशी उपसंचालक पूर्णपणे सहमत नव्हते. प्रशासकीय नियंत्रण नसल्याने ही घटना घडल्याने त्यांनी पुन्हा तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. यातडॉ. तेजराम भलावी यांच्यासोबतच डॉ. आशिष बैनलवार यांच्यावर ठपका ठेवला आहे.

Web Title: The doctor left the surgery for want of tea and biscuits; Inquiry committee blames two doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.