क्रूरतेचा कळस..! श्वानाला आधी बेदम मारहाण, मग अर्धमेल्या स्थितीत फरफटत नेऊन जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 10:54 AM2022-08-08T10:54:02+5:302022-08-08T10:57:24+5:30

आणखी दाेन श्वान गायब, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

The dog was first brutally beaten, then dragged away in a half-dead state and burned | क्रूरतेचा कळस..! श्वानाला आधी बेदम मारहाण, मग अर्धमेल्या स्थितीत फरफटत नेऊन जाळले

क्रूरतेचा कळस..! श्वानाला आधी बेदम मारहाण, मग अर्धमेल्या स्थितीत फरफटत नेऊन जाळले

Next

नागपूर : मुक्या जिवांप्रति काही विकृत लाेकांची क्रूरता कळस गाठायला लागली आहे. अशा घटना वारंवार समाेर येत आहे. अशीच एक क्रूरतेची घटना हजारीपहाड येथील डाॅग शेल्टरच्या जवळ घटली. अज्ञात आराेपींनी एका श्वानाला आधी काठीने बदडले, नंतर त्याचे पाय बांधून अर्धमेल्या अवस्थेत शेल्टरजवळ फरपटत आणले व ताे वेदनेने भुंकत असताना डिझेल टाकून जाळून टाकले. या अमानवीय प्रकाराविराेधात गिट्टीखदान पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काटाेल राेड नाक्याजवळ हजारीपहाड येथे श्वान व पशुप्रेमी स्मिता मिरे यांचे डाॅग शेल्टर आहे. त्या हे शेल्टर मागील दहा वर्षांपासून स्वखर्चाने चालवित असून, आता त्यांच्या शेल्टरमध्ये १५० पेक्षा अधिक श्वान आहेत. शहरात कुठेही अपघात किंवा इतर कारणाने श्वान किंवा इतर जनावरांना दुखापत झाली की स्मिता यांचे सहकारी घटनास्थळी पाेहोचून रेस्क्यू करतात आणि त्यांच्यावर उपचार करतात, असे अपघातग्रस्त अनेक श्वान त्यांच्या शेल्टरमध्ये मिळालेल्या सुश्रूषामुळे बरे झाले आहेत. त्यांचे शेल्टर मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणी आहे, जेथे रस्ते नाही की वीज नाही. ही जागा त्यांनी भाड्याने घेतली आहे. त्यांनी येथे सुविधा केली आहे. त्यामुळे कुणी भटकत नसलेल्या या भागात लाेक फिरायला यायला लागले आहेत. अशाच काही लाेकांनी त्यांना काही दिवसांअगाेदर शेल्टर बंद करण्याची धमकी दिल्याची माहिती स्मिता यांनी दिली.

शेल्टरमध्ये दिवसेंदिवस श्वानांची संख्या वाढली आहे आणि मर्यादित जागेमुळे त्यांना व्यवस्था करणे शक्य नसल्याने काही श्वान आसपास भटकत असतात. दरम्यान, काही दिवसांपासून त्यांच्या शेल्टरचे पाच श्वान अचानक दिसेनासे झाले. त्यांनी शाेधाशाेध घेतल्यानंतर त्यातील दाेन सापडले. ज्याला जाळून मारण्यात आले, हा त्यातलाच एक हाेता. त्यांनी लागलीच गिट्टीखदान पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल केला व घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेनात त्या श्वानाच्या पाठीपाेटावर व डाेक्यावर जबर मारहाण झाल्याचे दिसून आले आहे. त्याचे पाय नायलाॅनच्या दाेरीने जाेरात बांधले हाेते. दरम्यान, पाेलिसांनी तपास करण्याचा विश्वास दिला आहे.

आधी धमकी मिळाल्यानंतर एका श्वानासाेबत असा प्रकार झाल्याने आराेपींद्वारे शेल्टरमध्ये येऊन काही बरवाईट करण्याची भीती वाटत आहे. ही भाड्याची जागा असल्याने पक्के बांधकामही करता येत नाही. आम्ही महापालिकेला हजारदा जागा उपलब्ध करण्यासाठी व सुविधा देण्यासाठी विनंती केली आहे. मात्र आमच्या मानवीय कार्याला सहकार्य मिळाले नाही.

- स्मिता मिरे, पशुप्रेमी

Web Title: The dog was first brutally beaten, then dragged away in a half-dead state and burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.