मुलासाठी दार उघडे ठेवले, चोरट्याचा तीन लाखांवर डल्ला
By दयानंद पाईकराव | Updated: October 7, 2023 15:31 IST2023-10-07T15:31:07+5:302023-10-07T15:31:14+5:30
तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

मुलासाठी दार उघडे ठेवले, चोरट्याचा तीन लाखांवर डल्ला
नागपूर : मुलगा बाहेरून घरी यायचा असल्यामुळे दार उघडे ठेवणे एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले. चोरट्याने नजर चुकवून घरात प्रवेश करून ३ लाख ३ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला. ही घटना तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली.
बसेरुद्दीन अल्लाउद्दीन चव्हान (वय ६७, रा. मोमिनपूरा कब्रस्तान रोड, भानखेडा रोड) यांचे दुमजली घर असून सीताबर्डीत त्यांचे चपलांचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांचा मुलगा बाहेरून घरी यायचा असल्यामुळे ते दार उघडे ठेऊन टीव्ही पाहत होते. त्यांची नजर चुकवून अज्ञात आरोपीने त्यांच्या दारातून घरात प्रवेश केला. आरोपीने कपाटात ठेवलेले रोख ३ लाख ३ हजार ५०० रुपये चोरून नेले. चव्हान यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसिल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.