उपराजधानीतील डबलडेकर मेट्रो पुलाची गिनीज बुकमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2022 08:00 AM2022-12-04T08:00:00+5:302022-12-04T08:00:06+5:30
Nagpur News महामेट्रोद्वारे नागपूरच्या वर्धा रोडवर उभारण्यात आलेल्या डबलडेकर (वाया डक्ट) पुलाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे.
नागपूर : महामेट्रोद्वारे नागपूरच्या वर्धा रोडवर उभारण्यात आलेल्या डबलडेकर (वाया डक्ट) पुलाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. जगातील मेट्रो श्रेणीतील सर्वांत लांब पूल होण्याचा सन्मान या पुलाला लाभला आहे. ३.१४ कि.मी. लांबीच्या या डबलडेकर पुलाला एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हे प्रमाणपत्र मिळाले आहे. एशियातील सर्वांत लांब डबलडेकर पुलाची मान्यता या दोन्ही संस्थांनी प्रदान केली आहे.
येत्या मंगळवारी, ६ डिसेंबर रोजी मेट्रो भवनात आयोजित कार्यक्रमात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, लंडनचे एग्जुडिकेटर ऋषि नाथ हे प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करतील. महामेट्रोने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स (जीडब्ल्यूआर) मध्ये डबलडेकर पुलाचे नाव नोंदविण्यासाठी अर्ज केला होता. जीडब्ल्यूआरच्या भारतातील प्रतिनिधींनी याचा सविस्तर अभ्यास केला. यानंतर महामेट्रोचा दावा मान्य करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली. या प्रतिष्ठित व जगप्रसिद्ध रेकॉर्डसाठी महामेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही नागपूरकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.