चालकाला डुलकी लागली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 06:10 AM2023-07-02T06:10:25+5:302023-07-02T06:11:15+5:30
सतत बस चालविल्याने चालकाला डुलकी लागली असावी असा अंदाज आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या बसने समृद्धी महामार्गावर १५२ किलोमीटरचे अंतर कापल्यावर चालकाला डुलकी लागली व बस पोलला धडकली. नंतर रस्ता दुभाजकाला धडक देऊन बस डाव्या बाजूने उलटून २५ फुटांपर्यंत घासत गेली. यामुळे इंजिन ऑइल व नंतर डिझेलने पेट घेतला. त्यामुळे २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला, असा निष्कर्ष अमरावती ‘आरटीओ’ने काढला.
सायंकाळी पाच वाजता ही बस नागपूरहून निघाली होती. सतत बस चालविल्याने चालकाला डुलकी लागली असावी असा अंदाज आहे. ८०च्या वेगात असलेली बस दुभाजकाला धडकली. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटला. ‘एक्सल’ तुटल्यानंतर बस डाव्या बाजूला उलटली. बस जवळपास २५ मीटरपर्यंत दुभाजकाला घासत गेली. इंजिन ऑइलची टाकी व रस्त्याच्या घर्षणाने आग पकडली. याचदरम्यान फुटलेल्या टाकीतील डिझेलनेही पेट घेतला.