पिकनिकसाठी प्रवाशांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स २० फूट खोल दरीत कोसळली, ३१ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 01:05 PM2022-09-16T13:05:41+5:302022-09-16T13:10:18+5:30
हिंगणा-कवडस-वर्धा राेडवरील अपघात
नागपूर : नागपूरहून रिधाेरा (जि. वर्धा) येथील धरणाच्या दिशेने पिकनिकसाठी प्रवाशांना घेऊन निघालेली ट्रॅव्हल्स हिंगणा-कवडस- वर्धा राेडवरील पेंढरी (ता. हिंगणा) घाटात २० फूट खाेल दरीत काेसळली. यात ट्रॅव्हल्समधील सर्व ३१ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये सुहासिनी नहाते (४३, रा. त्रिमूर्तीनगर, नागपूर) अर्चना बडोले (५०, रा. त्रिमूर्तीनगर, नागपूर), डॉ. इंदिरा सोमकुवर (६२, रा. कपिलनगर, नागपूर), अनिल डोंगरे (३५, रा. इसासनी, ता. हिंगणा), राहुल गडलिंग (३८, रा. इसासनी, ता. हिंगणा), ट्रॅव्हल्सचालक लहू राऊत (रा. डोंगरगाव, गीतांजली तायवाडे, रा. नागपूर), पूनम चौधरी (रा. वाडी), अनुराधा काळबांडे (रा. सीआरपीएफ गेट, हिंगणा राेड, नागपूर), शिखा बोरकर (रा. कामठी, रंजना बडघरे), ज्योती नाईक, विभा रामटेके, साधना भुजाडे, सुनीता आंभोरे, कल्पना भांदकर यांच्यासह अन्य १५ जणांचा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाहीत.
हे सर्व जण ट्रॅव्हल्स बसने (क्र. एमएच-४०/एटी-०२१९) रिधाेरा येथील धरणाजवळ पिकनिकसाठी जात हाेते. त्या ट्रॅव्हल्समध्ये महिलांची संख्या अधिक हाेती. ती ट्रॅव्हल्स सकाळी ११ वाजताच्या सुमारास पेंढरी घाटात पाेहाेचली. चालक लहू राऊत याचा ट्रॅव्हल्सवरील ताबा सुटला आणि ती राेडलगतच्या २० फूट खाेल दरीत काेसळली. त्यात ट्रॅव्हल्समधील सर्व जण जखमी झाले.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यातील १२ जणांना डिगडाेह येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये, तर इतर जखमींना वानाडाेंगरी (ता. हिंगणा) येथील शालिनीताई मेघे हाॅस्पिटल, नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटल व हिंगणा शहरातील ग्रामीण रुग्णालयात भरती केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. मात्र, पाेलिसांकडे पूर्ण जखमींची नावे नव्हती. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस उपायुक्त प्रवीण तेजाळे, ठाणेदार विशाल काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी ट्रॅव्हल्सचालक लहू राऊत याच्या विराेधात गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
सर्वजण कंपनी कर्मचारी
आपण पिकनिकला जात हाेताे, अशी माहिती सुहासिनी नहाते यांनी पाेलिसांना दिली. या अपघातात बाराजणांना गंभीर, तर १९ जणांना किरकाेळ दुखापत झाली. या बसमध्ये २५ जण लूक इंटरनॅशनल नामक कंपनीचे कर्मचारी तर पाचजण स्वयंपाक तयार करणारे हाेते. त्या सर्वांना सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर शहरातील त्रिमूर्ती नगरात नास्ता करून प्रवासाला सुरुवात केली हाेती.