निवडणूक आली...‘फेक न्यूज’वर ठेवा ‘वॉच’!
By योगेश पांडे | Published: March 11, 2024 12:11 AM2024-03-11T00:11:48+5:302024-03-11T00:12:10+5:30
कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज : चार वर्षांत केवळ १३ गुन्हे दाखल.
नागपूर : ‘सबकुछ ऑनलाइन’च्या जमान्यात प्रसारमाध्यमेदेखील ‘ई’ चावडीवर सहजपणे उपलब्ध होतात. परंतु अनेकदा कुठलीही शहानिशा न करता नागरिकांकडून ‘फेक न्यूज’ एकमेकांना पाठविण्यात येतात. मात्र, असे करणे महागात पडू शकते. २०२० पासून नागपूर शहरात अशा प्रकारे ‘फेक न्यूज’ विविध ‘सोशल मीडिया’वर ‘पोस्ट’ करणे अनेकांना महाग पडले. ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार चार वर्षांत १३ गुन्हे दाखल झाले आहेत. ‘फेक न्यूज’चे एकूण प्रमाण लक्षात घेता गुन्ह्यांची संख्या अतिशय कमी आहे. विशेषत: निवडणुकीच्या काळात विविध दावे प्रतिदावे करणाऱ्या फेक न्यूजचा प्रसार वाढेल. अशा स्थितीत प्रशासनाने यावर विशेष लक्ष ठेवून लगेच कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षांत ‘स्मार्टफोन्स’ वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांचे नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. याचप्रमाणे अनामिक म्हणूनदेखील अनेकदा खोटे वृत्त विविध ‘प्लॅटफॉर्म्स’वर ‘पोस्ट’ करण्यात येते. एखाद्या परिचिताने पाठविले म्हणून ते इतरांकडूनदेखील समोर ‘फॉरवर्ड’ होते, असे प्रकार दररोज घडत असतात. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो. असे करणाऱ्यांविरोधात ‘आयटी अॅक्ट’मधील कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो. २०२० सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी प्राप्त झाल्या व नागपूर पोलिसांनी एकूण १३ प्रकरणांत गुन्हे दाखल केले. २०२० मध्ये ६, २०२१ मध्ये ४, २०२२ मध्ये एक व २०२३ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले. या कालावधीत २० जणांना अटक करण्यात आली. २०२० मध्ये १४ पुरुष व पाच महिलांना अटक झाली तर २०२२ मध्ये एकाला अटक झाली.
‘फेक प्रोफाईल’वरून शेअर होतात फेक न्यूज
‘सोशल मीडिया’वर ‘फेक न्यूज’ शेअर करताना अनेकदा खोट्या प्रोफाईल तयार करण्यात येतात. प्रकाशित झालेल्या न्यूजच्या क्लिपिंगमध्ये एडिटिंग करून किंवा चुकीचा स्क्रीनशॉट काढून अथवा एखाद्या वृत्तपत्र-वाहिनीचा लोगो वापरून खोट्या बातम्या तयार करण्यात येतात.
तक्रारीसाठी लोकच पुढे येत नाही
दररोज विविध ‘प्लॅटफॉर्म’वर ‘फेक न्यूज’ दिसून येतात. यातील काही बातम्या या सामाजिक सौहार्द बिघडविणाऱ्या किंवा समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्यादेखील असू शकतात. यासंदर्भात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाही. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
दाखल झालेले गुन्हे
वर्ष : गुन्हे
२०१६ : ४
२०१७ : २
२०१८ : ३
२०१९ : ३
२०२० : ६
२०२१ : ४
२०२२ : १
२०२३ : २