मनपाच्या क्रीडा संकुलातील कंत्राटदाराचे अतिक्रमण काढले
By मंगेश व्यवहारे | Published: July 4, 2023 02:15 PM2023-07-04T14:15:20+5:302023-07-04T14:16:27+5:30
प्रवर्तन विभाग व क्रीडा विभागाची कारवाई
नागपूर : महापालिकेच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुलाची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारानेच अतिक्रमण केले होते. यासंदर्भात क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी गणेशपेठ पोलिसात तक्रारही दाखल केली होती. सोमवारी मनपाच्या प्रवर्तन विभागाने कंत्राटदाराचे अतिक्रमण काढून फेकले. सकाळी ८ वाजताच प्रवर्तन विभाग व क्रीडा विभागाने ही कारवाई केली.
या क्रीडा संकुलाचे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट शैलेंद्र मधुकरराव घाटे यांच्याकडे दिले होते. यांचा कंत्राट संपुष्टात आला असून त्यांनी संकुलामध्ये अवैधरीत्या ताबा घेतला होता. संकुलाला कुलूप लावणे, गाड्या ठेवणे, कर्मचाऱ्यांना धमकी देणे याप्रकरणी त्यांच्या विरोधात मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी गणेशपेठ पोलिसात तक्रार दाखल केली होती. यापूर्वी कंत्राटदाराला संकुलात ठेवण्यात आलेले व्यायाम साहित्य, टेबल, खुर्ची, लोखंडी कपाट घेऊन जाण्याकरिता पत्र देण्यात आले होते. तरीही कंत्राटदाराने साहित्य परत नेले नव्हते. त्यामुळे सोमवारी ही कारवाई करण्यात आली. व्यायाम साहित्य व इत्यादी कंत्राटदाराचे साहित्य मनपा प्रवर्तन विभागाद्वारे क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यासमक्ष बाहेर काढण्यात आले व संकुल रिकामे करण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन अधीक्षक संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनात विनोद कोकरडे व अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली.
- राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे राजभवन परिसरात कारवाई
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा नागपूर दौरा असल्यामुळे राजभवन परिसरातील अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकान हटविण्यात आले. तसेच राजभवन ते फरस गेट व मानकापूर क्रीडा संकुल जवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैधपणे केलेले अतिक्रमण काढण्यात आले. आशीनगर झोनमध्येही कमाल चौकातील फुटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले फर्निचरचे दुकान हटविण्यात आले. त्यानंतर कबाडीलाइन येथे अवैध पद्धतीने लावण्यात आलेले कबाडीचे दुकान हटविण्यात आले.