वातावरण बदलले! दाेन दिवस वादळ, मग पाऊसधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2023 10:52 PM2023-06-21T22:52:51+5:302023-06-21T22:53:23+5:30
Nagpur News दाेन दिवस पाऊस कमी, पण वादळी वाऱ्याचा झंझावात जाेर करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. त्यानंतरचे पाच दिवस संपूर्ण विदर्भात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.
नागपूर : वर्षाचा सर्वांत माेठा दिवस असलेल्या बुधवारीही नागपूरकरांना उकाड्याने चांगलेच छळले. मात्र, सायंकाळ हाेताहाेता आकाशात ढगांच्या गर्दीसह पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले. दाेन दिवस पाऊस कमी, पण वादळी वाऱ्याचा झंझावात जाेर करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. त्यानंतरचे पाच दिवस संपूर्ण विदर्भात जाेरदार पावसाचा अंदाज आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून नागपूर आणि विदर्भात उष्ण लाटसदृश स्थितीने हाेरपळून निघाला आहे. त्यातही दमट वातावरणामुळे हाेणारा उकाडा अधिक त्रासदायक ठरला आहे. बुधवारी नागपुरात ४०.५ अंश पारा नाेंदविला गेला, जाे सरासरीपेक्षा ५.४ अंश अधिक आहे. ढगाळ व वादळी वातावरण तयार झाले असले तरी २२ जूनलाही उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पारा ४० अंशांखाली जाऊन उष्ण लाट लाेप पावेल.
वेधशाळेनुसार बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मान्सूनची बंगाल शाखा सक्रिय हाेत असून, त्यामुळे अरबी समुद्रात थंडावलेली मान्सूनची शाखासुद्धा ऊर्जितावस्थेत येईल. सुरुवातीला काेकणात ती अधिक जाेर दाखवील. २३ जूनपासून माेसमी आणि काही ठिकाणी पूर्वमाेसमी पावसाच्या शक्यतेमुळे २२ पासूनच वातावरणात बदल जाणवेल. नागपूरसह विदर्भात २६ जूनपर्यंत अतिजाेरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
दरम्यान, बुधवारी विदर्भात चंद्रपूरला पारा अंशत: वाढून ४२.६ अंशांवर गेला, जाे सरासरीपेक्षा ७.९ अंशांनी अधिक आहे. अकाेला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ वगळता इतर शहरांत तापमान ४० अंशाच्या वर आहे. रात्रीचे तापमानही अधिक असून उकाड्याचा त्रास हाेत आहे. नागपूरकरांना दिवसभर चिडचिड करणाऱ्या उकाड्याने छळले. हवा नसलेल्या ठिकाणी शरीरातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत हाेत्या. गुरुवारपासून हा उकाडा कमी हाेईल, अशी आशा वेधशाळेने व्यक्त केली आहे.