नागपूरमधील ईएसआयसी रुग्णालयाची चौकशी होणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:08 AM2022-03-22T06:08:09+5:302022-03-22T06:12:10+5:30
राज्य कर्मचारी विमा योजनेंअंतर्गत (ईएसआयसी) असलेल्या नागपुरातील रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
नवी दिल्ली : राज्य कर्मचारी विमा योजनेंअंतर्गत (ईएसआयसी) असलेल्या नागपुरातील रुग्णालयातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या संदर्भात शिवसेनेचे कृपाल तुमाने (रामटेक) यांनी प्रश्न विचारला होता. नागपुरातील या रुग्णालयात १०० खाटा आहेत. परंतु सोनोग्राफी व एक्स रे मशीनसुद्धा काम करीत नाही. या रुग्णालयात अनेक गैरव्यवहार होत असून ज्या व्यक्तीला निविदा दिल्या जातात, परंतु काम मात्र कुणी दुसरे करतात, याकडे तुमाने यांनी लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना भूपेंद्र यादव म्हणाले, या रुग्णालयाच्या कारभाराची माहिती घेऊन निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. रामटेक मतदारसंघात ईएसआयसीच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. परंतु काम थांबल्याचेही तुमाने यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रश्नाचे उत्तर देताना यादव म्हणाले, सध्या देशात ५७ रुग्णालयांचे काम प्रलंबित आहे. या रुग्णालयांचे काम सुरू करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
नवी मुंबई विमानतळाचे काम तीन वर्षांत पूर्ण होईल
नवी मुंबई विमानतळाचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी पूरक प्रश्न विचारला होता. मेट्रो शहरांमधील विमानतळांचा विस्तार होत आहे. परंतु लहान शहरांमधील विमानतळाचे विस्तारीकरण होत नसल्याचे पटेल यांनी निदर्शनास आणून दिले होते. यावर बोलताना शिंदे म्हणाले, मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमध्ये विमानांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे.
क्रूड ऑईलसाठी रशियावर अवलंबून नाही
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असले तरी भारत क्रूड ऑईलच्या आयातीसाठी रशियावर अवलंबून नसल्याचे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले. यासंदर्भात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रश्न विचारला होता. भारताच्या एकूण गरजेपैकी रशियाकडून केवळ ०.२ टक्के क्रूड ऑईल आयात करीत असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले. क्रूड ऑईल अमेरिका, कोरिया व आखाती देशातून आयात होते.
देशात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा पर्यावरण व शेतीवर विपरित परिणाम होत असून यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सोमवारी राज्यसभेत शून्य तासात केली.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना लोकांना करावा लागत आहे. सध्या मार्च महिना सुरू असतानाच महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमानात अचानकपणे वाढ झाली आहे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व दिल्लीतही उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. वातावरणात होत असलेल्या या बदलाचा परिणाम शेती व जीवनशैलीवर होत आहे.
महिलांना लढाऊ सैन्यात प्रवेश?
लढाऊ सैन्यात महिलांना प्रवेश देण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता.