वसंंतराव नाईक ऑडीटोरियमचा वनवास संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:34 PM2023-12-12T17:34:45+5:302023-12-12T17:36:05+5:30

सुरुवातीला घाेषणा झाल्यानंतर जागेच्या कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्या गेला.

The exile of Vasantrao Naik Auditorium never ends | वसंंतराव नाईक ऑडीटोरियमचा वनवास संपता संपेना

वसंंतराव नाईक ऑडीटोरियमचा वनवास संपता संपेना

नागपूर : हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन २०१२ मध्ये नागपुरात अत्याधुनिक 'वसंंतराव नाईक ऑडीटोरियम' उभारण्याचा स्तुत्य निर्णय शासनाने घेतला होता. जागा ठरली, आराखडा तयार झाला, पैसाही वर्ग करण्यात आला पण कार्यारंभ काही हाेत नाही. दरवेळी अधिवेशनात आश्वासने मिळतात पण सभागृह उभारण्याचा मुहूर्त काही सापडत नाही.

सुरुवातीला घाेषणा झाल्यानंतर जागेच्या कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्या गेला. राजभवन परिसरातील जागेनंतर नागपूर विद्यापीठाच्या मौजा पांढराबोडी येथिल सात एकर जागा निश्चित करण्यात आली. याप्रकरणी नासुप्रला २० कोटी रुपये मार्च २०१५ मध्ये वर्ग करण्यात आले. प्रकल्पाचा आराखडा, संकल्पचित्र देखील तयार करण्यात आले. अनेक आढावा बैठक झालीत. विधीमंडळात या संदर्भात आजवर आमदार हरिभाऊ राठोड, सुनील केदार, राजेश राठोड, अमित झनक, निलय नाईक आदिनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मिळालेल्या आश्वासनाची अद्यापही पुर्तता झालेली नाही.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार इंद्रनील नाईक, राजेश राठोड आणि एकनाथ पवार यांनी भेट घेतली. वसंंतराव नाईक ऑडिटोरीयम उभारले जाईल. त्यासाठी आवश्यक त्या निधीची देखील तरतूद केली जाईल. जागेचा निपटारा लावून लवकरच या प्रकल्पाला सुरूवात होईल, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नासुप्र आयुक्तांकडे पत्र पाठवून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देशही दिले. दर अधिवेशनात पाठपुरावा केला जातो. शासनाकडून आश्वासन मिळते, परंतु भूमिपूजन होत नसल्याने जनमाणसात नाराजी दिसून येते. शासनाने या प्रकल्पाकडे दूर्लक्ष न करता त्वरित जागा निश्चित करुन प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करावी. प्रकल्प अधिक काळ रेंगाळत ठेवल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी वसंतराव नाईक जन्मशताब्दी कमेटीचे सदस्य, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला.

"तब्बल १२ वर्षांपासून नाईक ऑडीटोरियमसाठी संघर्ष सुरू आहे. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करणारे महानायक वसंतराव नाईक यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अद्यापही प्रकल्पाचे भूमिपूजन झालेले नाही, त्यामुळे समाजात तिव्र असंतोष आहे. गांभीर्याने याबाबीचा विचार होऊन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करून वनवास संपवावे. "
- एकनाथ पवार, संयोजक, वसंतराव नाईक महोत्सव समिती

Web Title: The exile of Vasantrao Naik Auditorium never ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर