शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी; कार्यकर्त्यांना मात्र 'अच्छे दिन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 11:03 IST2022-11-11T11:00:35+5:302022-11-11T11:03:20+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पक्ष प्रवेशाची तयारी

शिंदे-ठाकरे गटाकडून पदाधिकाऱ्यांची पळवापळवी; कार्यकर्त्यांना मात्र 'अच्छे दिन'
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचे समर्थक आपली शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे आता एकमेकांच्या कार्यकर्त्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. आधीच नागपुरात शिवसेनेचे नावापुरतेच होते. आता त्यातही दोन गट झाल्यामुळे रस्सीखेच वाढली असून यामुळे कार्यकर्त्यांना मात्र अच्छे दिन आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी २.३० वाजता माधवनगरातील खात रोड रेल्वे मैदानावर त्यांची जाहीर सभा आहे. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची पूर्व विदर्भातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने ठाकरे गटातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना शिंदे गटात सामील करण्याची कसरत शिंदे गटाकडून सुरू आहे. शिवसैनिक हे स्वतःहून शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावाही शिंदे गटाकडून केला जात आहे.
शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह भेटले असता संविधान चौकात जल्लोष आयोजित करणारे शरद सरोदे यांना दोन दिवसांनी ठाकरे गटाकडून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नेमण्यात आले होते. याचा वचपा घेण्यासाठी ठाकरे गटातील युवा कार्यकर्त्यांना खेचण्याचे ऑपरेशन शिंटे गटाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांच्या माध्यमातून राबविण्यात आले.
नुकतेच हर्षल शिंदे (चंद्रपूर), शुभम नवले (नागपूर ग्रामीण), रोशन कळंबे (भंडारा), दीपक भारसाखरे (गडचिरोली) यांना शिंदे गटाकडून युवासेना जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. याशिवाय प्रफुल्ल सरवान (चंद्रपूर), राज तांडेकर (नागपूर), लखन यादव (रामटेक) यांना जिल्हा समन्वयक नेमले. आता मोठ्या पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाची नजर आहे.
कार्यकर्त्यांना थेट नेत्यांचे फोन
आजवर शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांकडून नागपूर- विदर्भातील शिवसैनिकांची फारशी विचारपूस होत नव्हती. मोठे नेतेही फारसे फिरकत नव्हते. कार्यकर्ता मुंबईत गेला तरी कुणी वेळ देत नाही, ऐकून घेत नाही अशी ओरड होती. आता मात्र, दोन्ही गटांच्या बड्या नेत्यांकडून थेट कार्यकर्त्यांना फोन येऊ लागले आहेत. काही अडचण असेल तर भेटा, काम असेल तर सांगा, असा नेत्यांचा दिलासादायक सूर त्यांना ऐकायला मिळत आहे.