विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही दिसणार महाविकास आघाडीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 11:41 AM2022-06-14T11:41:59+5:302022-06-14T11:43:49+5:30
नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाची सिनेट निवडणूक भाजपप्रणीत संघटनांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या धर्तीवर यंग टीचर्स, सेक्युलर आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषदेेने एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग आता विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही दिसणार आहे. विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विविध प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाची सिनेट निवडणूक भाजपप्रणीत संघटनांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या धर्तीवर यंग टीचर्स, सेक्युलर आणि विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषदेेने एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
कमला नेहरू महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात यंग टीचर्सचे प्रमुख डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी, सेक्युलर पॅनलचे संयोजक डॉ. डी. के. अग्रवाल, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. के. सी. देशमुख, डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, ॲड. मनमोहन बाजपेयी, डॉ. प्रदीप घोरपडे उपस्थित होते.
नागपूर व गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुकीच्या तयारीकरिता आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तयारीकरिता यंग टीचर्स असोसिएशन, सेक्युलर पॅनल, विद्यार्थी संग्राम परिषद व विद्यापीठ कर्मचारी संघटना या सर्व संघटनांच्या प्रमुख २०० कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी बैठकीत सर्व संघटना एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या धर्तीवर नागपूर व गोंडवाना विद्यापीठाची सिनेटची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली.
बैठकीला डॉ. भरत मेघे, डॉ. शरयू तायवाडे, डॉ. स्मिता वंजारी, डॉ. प्रिया वंजारी, जयंत पोटदुखे, डॉ. धनश्री बोरीकर, डॉ. राहुल खराबे, डॉ. किरण नेरकर, डॉ. विनोद गावंडे, डॉ. चेतन मसराम, डॉ. रामकृष्ण टाले, डॉ. राजीव जाधव, डॉ. धर्मेंद्र मुंदडा, डॉ. दिलीप बडवाईक व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.