ठरावावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव साधेच होते; रोहित पवार असं का म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:39 PM2022-12-28T12:39:45+5:302022-12-28T12:40:00+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारविरुद्ध सीमाप्रश्नी ठराव मांडला, तो मंजूरही झाला

The expression on the Chief Minister Eknath Shinde's face was simple; Why did Rohit Pawar say that? | ठरावावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव साधेच होते; रोहित पवार असं का म्हणाले

ठरावावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव साधेच होते; रोहित पवार असं का म्हणाले

Next

नागपूर - कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील ३६ गावांवर दावा केला होता, हा मुद्दा आता हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. गेल्या दोन दिवसापासून अधिवेशनात विरोधी पक्षातील सदस्यांनी कर्नाटक विरोधातील ठराव आणण्याची मागणी केली होती. मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने संमत करण्यात आला. मात्र, विरोधी पक्षांनी या ठरावात दम नसल्याचे म्हटले. आता, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ठराव संमत करतेवेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव साधेच होते, असे म्हटले आहे. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोट ठेवले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारविरुद्ध सीमाप्रश्नी ठराव मांडला, तो मंजूरही झाला. मात्र, ठराव मांडताना मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचे जे हाव भाव होते, ते अतिशय साधे होते. त्यांना तो ठराव अधिक आक्रमकपणे मांडता आला असता. पण, मुख्यमंत्र्यांकडे ती आक्रमता दिसून आली नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. आपण ठराव मांडल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होतात, पण आपण आक्रमक होऊ शकत नाही यामागचे कारण काय. म्हणजे अप्रत्यक्षपणे कर्नाटकमध्ये भाजप निवडून यावी, यासाठीच प्रयत्न करतोय का, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. 

अधिकाऱ्यांचे निलंबन चुकीचे

आक्रमकता कशासाठी असावी हेही रोहित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या विरोधात, महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधात कोण बोलत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत, असा संदेश आपल्या आक्रमक भूमिकेतून जात असतो, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, कर्जत-जामखेड मतदारसंघातील तहसिलदार आणि प्रांत अधिकारी यांचे निलंबन केल्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. याच अधिकाऱ्यांनी गेल्या २ वर्षात चांगलं काम केलं. लाखो लोकांना मदतही त्यांच्यामुळेच मिळाली. केवळ मला अडचणीत आणण्यासाठी हा निर्णय घाईघाईने घेतला असून तो चुकीचा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं.
 

Web Title: The expression on the Chief Minister Eknath Shinde's face was simple; Why did Rohit Pawar say that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.