शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलणार; २७० कोटींच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 08:00 AM2023-05-23T08:00:00+5:302023-05-23T08:00:02+5:30
Nagpur News मेडिकलमध्ये येणारा रुग्ण हा गरीब व सामान्य असला तरी त्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी मेडिकलच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जुने शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ करण्यासाठी १२२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : मेडिकलमध्ये येणारा रुग्ण हा गरीब व सामान्य असला तरी त्यांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी मेडिकलच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे. जुने शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ करण्यासाठी १२२ कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता मेडिकलमध्येही शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका टळणार आहे. यासह २७० कोटींमधून होणाऱ्या विविध कामांमुळे मेडिकलचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी विकासकामांना वेग दिला आहे. पहिल्या टप्प्यात मेडिकलला जवळपास २७० कोटींना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
-२८ शस्त्रक्रियागृहांचा कायापालट
मेडिकलमधील सामान्य शल्यचिकित्सा विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिव्यंगोपचार विभाग, कान, नाक व घसा विभाग, प्लास्टिक सर्जरी विभाग, नेत्र रोग विभाग, हृदय शस्त्रक्रिया विभाग, मेंदू शल्यक्रिया विभाग व युरोलॉजी विभाग मिळून २८ शस्त्रक्रियागृह (ओटी) आहेत. १२२ कोटींमधून या सर्व ओटी अद्ययावत म्हणजे ‘मॉड्युलर’ होणार आहेत. यात ‘११ कोटी कॉम्प्लेक्स’चाही समावेश आहे.
-‘आयसीयू’ होणार अद्ययावत
मेडिकलमधील अतिदक्षता विभागही (आयसीयू) अद्ययावत करण्यासाठी २० कोटी २२ लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
-४५ कोटींचे पेईंग वॉर्ड
मेडिकलकडे श्रीमंत रुग्णांना वळविण्यासाठी ‘पेईंग वॉर्ड’चाही विकास केला जाणार आहे. यासाठी सरकारने ४५ कोटींना मंजुरी दिली आहे.
-‘स्काय वॉक’मुळे मेडिकलला जुळणार ट्रॉमा
मेडिकल व ‘ट्रॉमा केअर सेंटर’ला जोडण्यासाठी ‘स्कॉय वॉक’होणार आहे. या कामासाठी ४ कोटी ९३ लाखांना मंजुरी मिळाली आहे. सोबतच ९ कोटींमधून सुरक्षा भिंत, ५ कोटींमधून सभागृह व २ कोटींमधून गेस्ट हाऊसच्या नूतनीकरणाची कामे होणार आहेत.
-निवासी डॉक्टरांसाठी ४०० खाटांचे वसतिगृह
जुनाट वसतिगृहातील समस्यांमुळे निवासी डॉक्टर त्रस्त होते. परंतु, आता लवकरच ६२ कोटी ८४ लाखांमधून ४०० खाटांचे वसतिगृह डॉक्टरांच्या सेवेत असणार आहे.
-मेडिकलची प्रगतीच्या दिशेने वाटचाल
मेडिकलमधील बांधकामासह विविध प्रकल्पासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. मेडिकलची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. बांधकाम पूर्ण होत आहे, अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध होत आहे. याचा फायदा येथील विद्यार्थ्यांसह डॉक्टर व रुग्णांना होणार आहे.
-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल