शेतकरी लागला पेरणीच्या कामाला; पावसाची प्रतीक्षा संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 10:13 PM2023-06-29T22:13:16+5:302023-06-29T22:13:42+5:30
Nagpur News दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
नागपूर : गत दोन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची चौफेर रिमझिम सुरू आहे. कुठे कमी-जास्त तर कुठे समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तर, काही शेतकरी अद्याप वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. रिमझिम सुरू असलेला पाऊस पेरणीपश्चात हुलकावणी तर देणार नाही ना, अशी भीती त्यांना सतावत आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असताना मान्सून लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. अशातच शनिवारी (दि. २४) तालुक्यात काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारला काहीशी उसंत घेत, पुन्हा सोमवारपासून बुधवारला (दि. २८) दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. त्यामुळे काही गावांत गत दोन दिवसांपासून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला हात लावला आहे. तालुक्यात पाच महसूल मंडळे आहेत. यातील भिवापूर मंडळात मंगळवार व बुधवार अनुक्रमे ७५ व ३५ मिमी पाऊस पडला. तर कारगाव मंडळात अनुक्रमे ४७ व २७ मिमी, नांद मंडळात अनुक्रमे २० व ७.२० मिमी, मालेवाडा अनुक्रमे १२ व ५ मिमी तर जवळी मंडळात ८ व ५ मिमी पाऊस पडला. तालुक्यात ३२.८० मिमी व १५.८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी घरगुती दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढला आहे. कंपन्यांच्या बियाण्यांच्या किमती दिवसागणिक वाढत असून बियाण्यांची बोगसबाजी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून सतत प्रयत्न होत असतात. याचाच एक भाग म्हणजे गत काही वर्षांपासून कृषी विभाग शेतकऱ्यांना खरिपासाठी घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देत आहे.
यावर्षी तालुक्यात जवळपास ९० टक्के शेतकरी पेरणीसाठी घरगुती बियाणे वापरत आहेत. सोयाबीन स्वपरागीत असल्याने त्याचे संकरित वाण नाही. त्यामुळे प्रमाणित बियाणे पुढील तीन वर्षे वापरता येते. उत्पन्नात कोणतीही घट येत नाही. तालुक्यात ‘सोयाबीन राखीव बियाणे मोहीम’ युद्धपातळीवर राबविण्यात आली. गावागावांत सभा व बैठकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुयोग्य पद्धतीने बियाणे साठवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. मात्र, ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. खासगी कंपनीचे बियाणे वापरताना पिशवीचे लेबल जपून ठेवावे. निविष्ठाचे पक्के बिल घ्यावे. बिलावर लॉट नंबर, साठा, किंमत व स्वाक्षरी नमूद असावी. कुठे काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
-राजेश जारोंडे, तालुका कृषी अधिकारी, भिवापूर