परिचारिकांच्या संपाचा पाचवा दिवस; ८५० रुग्णांची काळजी घेताहेत 'मिळून सातजणी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 12:07 PM2022-05-31T12:07:07+5:302022-05-31T14:00:04+5:30
परिचारिकांच्या संपामुळे मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित, ८५० रुग्णांचा भार ७ परिचारिकांवर
नागपूर : परिचारिकांच्या संपामुळे मेयो, मेडिकलमधील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. सोमवारी रात्री मेडिकलमध्ये भरती असलेल्या जवळपास ८५० रुग्णांचा भार केवळ ७ परिचारिकांवर होता. त्यांच्या मदतीला बीएससी नर्सिंग महाविद्यालयाचे २० विद्यार्थी असले तरी त्यांचा अनुभव कमी पडत असल्याचे चित्र होते.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आपल्या मागण्यांना घेऊन २६ मेपासून संपावर आहेत. संपाचा सोमवारी पाचवा दिवस असूनही तोडगा निघाला नव्हता. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात असल्याने, अर्धवट उपचार करून रुग्णांना घरी पाठविण्यात आल्याने व इमर्जन्सी शस्त्रक्रियांनाही उशीर होत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. निवासी डॉक्टर आपल्यापरीने त्यांना समजाविण्याचा प्रयत्न करीत असले तरी कधीही संतापाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
-बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जुंपले रुग्णसेवेत
मेडिकलमधील बीएससी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्यांवर होते. सोमवारी हे विद्यार्थी सुट्ट्यांवरून महाविद्यालयात पोहोचताच येथील दुसऱ्या, तिसऱ्या व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आल्याआल्या रुग्णसेवेत जुंपले. यांची संख्या शंभरच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यांचे अनुभव कमी पडत असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.
-दिवसभरात १३ गंभीर शस्त्रक्रिया
मेडिकलमध्ये विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सोमवारी १३ गंभीर तर एक किरकोळ शस्त्रक्रिया झाली. याचा ताण निवासी डॉक्टरांवर आला आहे. त्यांनाच शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक साहित्य व औषधांची जुळवाजुळव करावी लागत आहे. उन्हाळी सुट्ट्यांवर असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांच्याही सुट्ट्या रद्द झाल्याने तेही आज वॉर्डात राउंड घेताना दिसून आले.
-लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वात २३ ते २५ मे या दरम्यान रोज एक तासाचे काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २६ व २७ मे रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले. परंतु सरकार संघटनेच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचे पाहता २८ मेपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले. यामुळे रुग्णांना होत असलेल्या गैरसोयीसाठी सरकार जबाबदार आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप कायम राहील, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
-जुल्फे कार अली, सचिव महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, नागपूर शाखा