थंडीपासून बचावासाठी पेटविलेली शेकोटी उठली जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 09:54 PM2022-11-28T21:54:20+5:302022-11-28T21:54:55+5:30
Nagpur News शेकोटीने भाजलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला. मेहरबाबानगरात ही दुर्दैवी घटना घडली असून लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
नागपूर : हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवताना दिसून येतात. मात्र हीच शेकोटी प्राणघातकदेखील ठरू शकते. शेकोटीने भाजलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू झाला. मेहरबाबानगरात ही दुर्दैवी घटना घडली असून लीलाबाई झोडापे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांनी घराच्या मागील अंगणातील पालापाचोळा एकत्रित केला. तो फेकून देण्यापेक्षा शेकोटी पेटवावी या विचारातून त्यांनी शेकोटी पेटवली. मात्र त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला व त्यात त्या ५० टक्क्यांहून अधिक जळाल्या. त्यांच्या किंकाळ्या ऐकून कुटुंबिय व शेजारच्यांनी धाव घेतली. त्यांना लगेच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर त्यानंतर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसात शेकोटी पेटविताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.