नागपूर जिल्ह्यातील बेल्याजवळ सापडली विदर्भात पहिली शेती करणाऱ्यांची वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 10:12 PM2023-02-20T22:12:35+5:302023-02-20T22:14:44+5:30

Nagpur News उमरेड तालुक्यातील बेलाजवळ काेहळा गावानजीक अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. विदर्भात पहिल्यांदा शेती करणाऱ्यांची वसाहतच येथे असावी, असा दावा पुरातत्व संशाेधक डाॅ. मनाेहर नरांजे यांनी केला आहे.

The first farming settlement in Vidarbha was found near Belya in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील बेल्याजवळ सापडली विदर्भात पहिली शेती करणाऱ्यांची वसाहत

नागपूर जिल्ह्यातील बेल्याजवळ सापडली विदर्भात पहिली शेती करणाऱ्यांची वसाहत

googlenewsNext
ठळक मुद्देअडीच-तीन हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी, दफन स्मारके, सांस्कृतिक वारसा

नागपूर : उमरेड तालुक्यातील बेलाजवळ काेहळा गावानजीक अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या महापाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. विदर्भात पहिल्यांदा शेती करणाऱ्यांची वसाहतच येथे असावी, असा दावा पुरातत्व संशाेधक डाॅ. मनाेहर नरांजे यांनी केला आहे.

डाॅ. नरांजे हे सात वर्षांपूर्वी काेहळा गावी मित्राच्या शेतावर गेले हाेते. या भागात एक ‘सतीची पार’ प्रसिद्ध हाेती व ती पार शाेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, त्यांना या परिसरात माेठ्या संख्येत असलेली शीलावर्तुळे आढळून आली. उमरेड परिसरात अशी शीलावर्तुळे माेठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांचे कुतूहल जागृत झाले. त्यांनी वारंवार जाऊन शाेध सुरू केला. त्यांना माेठ्या संख्येने दफन स्मारकेसुद्धा आढळून आली. ही स्मारके असल्याने या भागात वसाहतही असावी, असा अंदाज बांधत त्यांनी व्यापक सर्वेक्षण सुरू केले. पावसाळ्यात शेतपिके व गवतामुळे शाेधणे कठीण हाेते. त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात शाेध सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. नागरी वसाहतीचे पुरावे दर्शविणारे अनेक अवशेष त्यांना आढळून आले.

या भागात शीलावर्तुळांसह सुबक रंगकाम केलेली मातीची भांडी, दैनंदिन वापरातील अनेक वस्तू, मातीच्या खेळणी, लाेखंडाची हत्यारे, घाेड्यांचे अवशेषही सापडले. हे सर्व अवशेष महापाषाण काळातील असण्याचा त्यांचा विश्वास पक्का झाला. येथे राहणाऱ्या महापाषाणयुगीन लाेकांनी पहिल्यांदा शेती केली असावी, असा दावा त्यांनी केला. याशिवाय मातीतून लाेह गाळण्याची पद्धतही नागरिकांना अवगत असल्याचे त्यांनी सांगितले. कारण पारशिवनी तालुक्यात नयनकुंड येथे उत्खननात लाेह गाळण्याची भट्टी आढळली हाेती. विदर्भ संशाेधन मंडळाच्या वार्षिक अंकातही बेलाजवळच्या काेहळ्यातील सर्वेक्षणाचा डाॅ. नरांजे यांचा शाेधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

नुकतेच बेला पंचायत समिती सर्कलचे लाेकप्रतिनिधी पुष्कर डांगरे व सहकाऱ्यांनी या भागातील अवशेषांची पाहणी केली व संवर्धनासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

सातवाहन, वाकाटक काळातील अवशेषही

- महापाषाण काळानंतरचे सातवाहन, वाकाटक राजवटीचे पुरावे दर्शविणारे साहित्यही येथे आढळले. यामध्ये मातीच्या विटा, पाटा-वरवंट्याचे तुकडे, मध्ययुगातील शिवलिंग, नंदी व इतर मूर्तींचे भग्न तुकडे या भागात माेठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे या भागात सांस्कृतिक सातत्य असल्याचा दावा डाॅ. नरांजे यांनी केला आहे.

या भागात उत्खनन व्हावे अशी मागणी पुरातत्व विभागाला केली हाेती. मात्र या भागातील शेती किंवा निधीचा अभाव असल्याने कदाचित दुर्लक्ष करण्यात आले असेल. मात्र या भागात उत्खनन हाेण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे या परिसरातील समृद्ध संस्कृतीचे पुरावे प्रकाशात येतील.

- डाॅ. मनाेहर नरांजे, पुरातत्व संशाेधक

Web Title: The first farming settlement in Vidarbha was found near Belya in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास