अभय योजनेचा पहिला टप्पा आता २९ पर्यंत
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 8, 2024 08:23 PM2024-02-08T20:23:04+5:302024-02-08T20:23:16+5:30
‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’ : प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार
नागपूर : महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ दोन टप्प्यात १ डिसेंबर २०२३ पासून कार्यन्वित केली आहे. आधी ३१ जानेवारीपर्यंत असलेला पहिला टप्पा आता २९ फेब्रुवारीपर्यंत वाढविला आहे. पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारीपर्यंत नागपूर शहर आणि ग्रामीण भागातून एकूण ३ कोटींचा महसूल मिळाला आहे.
योजनेंतर्गत वर्ष २००० पासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढून जास्तीत जास्त महसूल वसुलीचे मुद्रांक शुल्क विभागाचे लक्ष्य आहे. ही योजना ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत आणि माफी देणारी आहे. योजनेचा फायदा ग्राहकांना होत आहे. राज्य सरकारने ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी दोन टप्प्यात आणली. आता पहिला टप्पा २९ फेब्रुवारीपर्यंत असून अर्ज सादर करणाऱ्या ग्राहकांचा १ रुपये ते १ लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्क व दंडामध्ये १०० टक्के माफी आणि एक लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कावर ५० टक्के माफी आणि १०० टक्के दंड माफ होणार आहे. दुसरा टप्पा १ ते ३१ मार्चपर्यंत असून अर्ज सादर केलेल्यांना १ रुपये ते १ लाख इतक्या फरकाच्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कात ८० टक्के आणि दंडामध्ये ८० टक्के माफी तसेच १ लाखापेक्षा जास्त मुद्रांक शुल्कात ४० टक्के आणि दंडात ७० टक्के माफी मिळणार आहे.
अभय योजना ही सर्व प्रकारच्या नोंदणीस दाखल केलेल्या अथवा न केलेल्या सर्व प्रकारच्या दस्तऐवजांना लागू आहे. सवलत वा माफी मिळण्यासाठी पक्षकार, त्यांचे वारस अथवा मुखत्यारपत्र धारकांस अर्ज करता येईल. त्यांनी मूळ दस्तऐवजांसह मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा सह दुय्यम निबंधक यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. दस्तऐवज कायदेशिररीत्या योग्य आणि मुद्रांकित करून घेण्यासाठी योजना फायद्याची असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे आणि नागपूर शहरचे मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी दिली.