समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू होणार, नगरविकास मंत्र्यांनी दिले संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 05:04 PM2022-03-27T17:04:32+5:302022-03-27T17:21:26+5:30
समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिंदे वर्धा येथे आले होते.
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा मे महिन्यात सुरू करण्याचा मानस आहे. तर, दुसरा टप्पा हा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
आज त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या कामाच्या पाहणीसाठी शिंदे वर्धा येथे आले होते. मे महिन्यात महामार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील यांचादेखील तसाच आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव यांच्याकडील मालमत्ता व कथित डायरीप्रकरणी प्रश्न विचारला असता याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. तसेच, सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या काही चौकशी सुरू आहे. जे खरोखर असतील, भ्रष्ट असतील त्यांची केंद्रीय यंत्रणांनी जरूर चौकशी करावी. राजकीय सूड भावनेपोटी अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही, लोकशाहीमध्ये हे बरोबर नाही असे शिंदे म्हणाले.
नेमके काय प्रकरण आहे ?
माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी कोविडच्या काळात २४ महिन्यांत मुंबई महापालिकेला लुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. या काळात त्यांनी ३८ मालमत्ता खरेदी केल्या असून, २०१८ ते २०२२ दरम्यानच्या दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख डायरीत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या डायरीत ५० लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे.