राज्यातील पहिली निवासी जिम्नॅस्टिक अकादमी होणार अमरावतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 07:00 AM2022-01-21T07:00:00+5:302022-01-21T07:00:13+5:30
Nagpur News राज्य शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्पाअंतर्गत राज्यातील पहिली निवासी जिम्नॅस्टिक अकादमी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (एचव्हीपीएम) अस्तित्वात येणार आहे.
नीलेश देशपांडे
नागपूर : राज्य शासनाच्या खेलो इंडिया प्रकल्पाअंतर्गत राज्यातील पहिली निवासी जिम्नॅस्टिक अकादमी अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (एचव्हीपीएम) अस्तित्वात येणार आहे. पायाभूत क्रीडा सुविधांसाठी देशात ख्यातिप्राप्त असलेल्या एचव्हीपीएममध्ये या अकादमीच्या रूपाने आणखी सुविधांची भर पडेल. केंद्र शासनाच्या या पुढाकाराचे या खेळातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.
एचव्हीपीएमच्या सचिव माधुरी चेंडके ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या, ‘निवासी अकादमीसाठी आम्हाला मान्यता मिळाली असून यासंदर्भात समिती देखील स्थापन करण्यात आली. समितीत साईचे क्षेत्रीय संचालक नितीन जैस्वाल, कोच रामकृष्ण लोखंडे आणि विकास कुमार यांचा समावेश असून समितीने सुविधांची पाहणी केली. समितीने आपला अहवाल राजधानीतील साई कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यावर मान्यता अपेक्षित आहे.
या अकादमीत राज्यातील प्रत्येकी १५-१५ मुला-मुलींचा समावेश असेल. साई कोचेस सर्वांना प्रशिक्षण देतील. खेळाडूंच्या निवास आणि भोजनाशिवाय शिक्षणाची व्यवस्था देखील केली जाईल. संस्थेचे मुख्य सचिव प्रभाकर वैद्य यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले असल्याची माहिती चेंडके यांनी दिली.
शहरातील जिम्नॅस्टिक कोच युग छेत्री म्हणाले, ‘आधी आमचे जिम्नॅस्टिकपटू औरंगाबादच्या साई केंद्रात जायचे. अमरावती जवळ असल्याने खेळाडूंचा त्रास कमी होईल. निवासी अकादमीमुळे या खेळात भविष्यात खेळाडूंची संख्या वाढेल, असा विश्वास वाटतो.’
...................................................................