नागपुरात वडिलांना न्यायासनावर पाहिले ते न्यायदेवतेचे पहिले दर्शन; सरन्यायाधीश उदय लळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 12:25 PM2022-09-04T12:25:04+5:302022-09-04T12:26:04+5:30
हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला.
नागपूर : वडील उमेश लळीत मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती झाल्यानंतर त्यांच्या नागपुरातील शपथविधीला हजर नव्हतो, परंतु त्यांचे पद जाणार कळल्यानंतर, त्यांना काम करताना पाहण्यासाठी न्यायालयात आलो होतो. ते दृश्य हे न्यायदेवतेचे पहिले दर्शन, न्यायदानाच्या क्षेत्रातील जणू पहिले पाऊल होते, अशी हृदय आठवण सरन्यायाधीश उदय लळीत यांनी शनिवारी येथे राज्यातील पहिल्या सत्काराच्या वेळी सांगितली. त्या आठवणींनी ते गहिवरले. भावना अनावर झाल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले.
हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित देशाचे ४९वे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्काराचा सोहळा सर्व उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने खऱ्या अर्थाने कौटुंबिक सोहळा ठरला. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सरन्यायाधीशांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व सरन्यायाधीश लळीत यांच्या पत्नी अमिता लळीत मंचावर होत्या.
सरन्यायाधीश लळीत यांनी नागपुरातील बालपणीच्या आठवणी सांगितल्या. वडील १९७४ ते १९७६ या काळात नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायमूर्ती होते. त्यामुळे आपला कायद्यासोबतचा खरा प्रवास नागपूरमधून सुरू झाला. पुढे वकील म्हणून येथे अनेक प्रकरणांमध्ये युक्तिवाद केला. नागपूरसोबत अत्यंत भावनिक संबंध आहेत, असे ते म्हणाले.
हे ललीत नसून लळीत आहेत
सरन्यायाधीश लळीत यांना बहुतेक जण ललीत म्हणतात, परंतु सरन्यायाधीशांचे आडनाव ललीत नसून लळीत आहे, असा खुलासा सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी केला, त्यांनी लळीत यांच्या बौद्धिक संपन्नतेची प्रशंसाही केली. त्यांच्या नेतृत्वात भारतीय न्यायव्यवस्थेला विकासाची दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यायव्यवस्थेचा नवीन काळ सुरू होईल
सरन्यायाधीश लळीत अत्यंत उच्च बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय न्यायव्यवस्थेचा नवीन काळ सुरू होईल, असे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितले.