फाेरलेनचे काम सुरू झाल्यावर वनविभागाला आठवले टायगर काॅरिडाेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 04:10 PM2022-04-07T16:10:07+5:302022-04-07T16:25:28+5:30
सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे.
वसीम कुरैशी
नागपूर : बऱ्याच वर्षांपासून अरुंद असलेल्या नागपूर-काटाेल मार्गाचे चाैपदरीकरण हाेत असून त्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र मार्गाचा काही भाग पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरमधून जात असल्याची आठवण वनविभागाला आता झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या मार्गाच्या फाेर लेनचे काम सुरू करताना स्टेज-१ व स्टेज-२ साठी गेल्या वर्षीच वन व पर्यावरणाची मंजुरी मिळाली हाेती. त्यामुळे आता आलेल्या आक्षेपावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जवळपास ५० किलाेमीटरच्या कामादरम्यान आता २५ कि.मी.चे चाैपदरीकरणाचे काम थांबले आहे. त्यामुळे आता हे काम कधी पूर्ण हाेईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे. या कारणाने प्रकल्पाचे काम सध्या १३ ते ३५ कि.मी.दरम्यान सुरू आहे.
विशेष म्हणजे नागपूरमधून अमरावती, हैदराबाद, भाेपाळ, रायपूर अशा चारीही दिशांना महामार्ग आहेत आणि हे सर्व मार्ग वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात येतात. तरीही अडथळा निर्माण झाला नाही. त्यात केवळ नागपूर-जबलपूर मार्गावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात ९ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. याबाबत पीसीसीएफ (वन्यजीव) यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.
आक्षेप घेणारेही संभ्रमात
अधिकारिक सूत्रानुसार २९ ऑक्टाेबर २०२१ राेजी चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२ म्हणजे वर्षभरानंतर वनविभागाचे सीसीएफ यांनी एपीसीसीएफ यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रकरण पीसीसीएफ (वन्यजीव) यांच्याकडे पाठविण्यात आले. आता या अडथळ्यांवर पर्याय शाेधण्याचा प्रयत्न हाेत आहे.
डब्ल्यूडब्ल्यूआयकडून मागितला सल्ला
वनविभागाने रस्त्याचे काम सुरू असलेला परिसर वन्यजिवांचा भ्रमणमार्ग असल्याचे म्हटल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वन्यजीव संस्थेला (डब्ल्यूडब्ल्यूआय) सल्ला मागितला आहे. जानकारांच्या मते या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे आणि नवीन पर्याय ठरविण्याच्या कामात नऊ महिने लागण्याची शक्यता आहे.
हा ठरू शकतो पर्याय
चाैपदरीकरणाचे काम भ्रमणमार्गातून जात असल्याने या भागात अंडरपास बनविण्याचा पर्याय सुचविला जाऊ शकताे. मात्र यामुळे डिझाईनमध्ये बदल करावा लागेल आणि आणखी काही मंजुरी घ्याव्या लागतील. शिवाय प्रकल्पाचा खर्चही वाढेल.
प्रकल्पाचे महत्त्वाचे बिंदू
- नागपूर-काटोल फोर लेन प्रकल्पाची लांबी ४८.२ किमी.
- प्रकल्पाचा एकूण खर्च ५९० काेटी रुपये.
- आधीच्या करारानुसार २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करायचा आहे.
- काम सुरू हाेऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.
- प्रकल्पाअंतर्गत काटाेल व कळमेश्वरमध्ये दाेन आरओबीचा समावेश आहे.
- काटाेलमध्ये ११ कि.मी.चा नवीन बायपास अलाईनमेंट.
- बायपास असल्याने वाहनांना काटाेलमध्ये दाखल हाेण्याची गरज नाही.
- प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची आवश्यकता पडली नाही.