‘टार्गेट’वर असणारा न आल्याने संघर्षचाच नाहक झाला ‘गेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 02:47 PM2022-07-21T14:47:42+5:302022-07-21T14:47:54+5:30
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
नागपूर : गुन्हेगाराच्या पत्नीशी प्रेमसंबंध ठेवण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या वादातून बुधवारी अंबाझरी तलावाजवळ संघर्ष मेश्राम या तरुणाची हत्या झाली. आपल्या भावावर हल्ला करणाऱ्यांचा आरोपींना ‘गेम’ करायचा होता. मात्र ते हाती न लागल्यामुळे संघर्षचा बळी गेला. किरकोळ मारहाणीच्या घटनांना गांभीर्याने न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
सुभाष नगर मेट्रो स्टेशनजवळ मंगळवारी रात्री आरोपी शुभम उर्फ बॉबी साहू आणि शरून कुर्बान मन्सुरी यांनी संघर्षची हत्या केली. घटनेनंतर लगेचच आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉबीचा मोठा भाऊ अक्षय साहू हा जयताळातील गुन्हेगार रोहितच्या पत्नीशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करत होता. तो रोहितच्या बायकोशी चॅटिंगदेखील करायचा. याची माहिती मिळताच २ जुलै रोजी रोहित, त्याचा भाऊ आणि दोन अल्पवयीन मुलांनी अक्षयवर हल्ला करून जखमी केले. एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्हादेखील दाखल केला होता. तेव्हापासून बॉबी रोहितला धडा शिकविण्याची संधी शोधत होता.
रोहितवर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. रोहितची जामिनावर सुटका होताच, आरोपींपासूनचा धोका आणि पत्नीचा वाद लक्षात घेऊन तो जयताळा सोडून दुसरीकडे रहायला गेला. रोहितची मृत संघर्षशी मैत्री होती. हल्ल्यात संघर्षचादेखील सहभाग असल्याचा बॉबीला संशय होता. त्यामुळेच नियोजनानुसार बॉबी आणि शरूनने मंगळवारी सायंकाळी जयताळा येथून संघर्षचे एका कारमधून अपहरण करून अंबाझरी तलावात आणले. बॉबीने संघर्षच्या मोबाईलवरून रोहितला कॉल केला. ‘आम्ही संघर्षला उचलले आहे व तुम्ही बोलण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ पोहोचा’, असे सांगितले.
रोहितने तेथे येण्यास नकार देत आरोपींना रहाटे कॉलनीत बोलावले. रोहित येणार नसल्याचा संशय आल्याने आरोपींनी संघर्षला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत अर्धमेला केला. यानंतर डोक्यात हातोड्याने वार करून खून करून पळ काढला. अगोदर आरोपींनी आम्ही दगडाने ठेचून मारल्याचा दावा केला. मात्र, पोलिसी खाक्या पडल्यावर त्यांनी हातोड्याने प्रहार केल्याची कबुली दिली. दोघांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.