हजारो वर्षांपूर्वीही खेळला जात होता 'ब्रेनव्हिटा' हा खेळ; चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 08:00 AM2023-01-17T08:00:00+5:302023-01-17T08:00:07+5:30
Nagpur News सध्या दक्षिण आशियासह पाश्चिमात्य देशात प्रचलित असलेला 'ब्रेनव्हिटा' हा असाच खेळ आहे, जाे किमान हजार वर्षापूर्वी ‘बुद्धिजाळ’ या नावाने खेळला जायचा. या बुद्धिजाळ खेळाचे अवशेष चिमुर तालुक्यात नेरी या गावच्या प्राचीन शिवमंदिरात आढळले आहेत.
निशांत वानखेडे
नागपूर : शेकडाे, हजाराे वर्षांपूर्वीपासून वेगवेगळे खेळ हे मानवी जीवनात अविभाज्य भाग राहिले आहेत. यातले काही खेळ स्वरूप बदलून आताही खेळले जातात. सध्या दक्षिण आशियासह पाश्चिमात्य देशात प्रचलित असलेला 'ब्रेनव्हिटा' हा असाच खेळ आहे, जाे किमान हजार वर्षापूर्वी ‘बुद्धिजाळ’ या नावाने खेळला जायचा. या बुद्धिजाळ खेळाचे अवशेष चिमुर तालुक्यात नेरी या गावच्या प्राचीन शिवमंदिरात आढळले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या नेरी या गावी असलेले हे प्राचीन महादेव मंदिर चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीचे असून, ई. सण १० किंवा ११व्या शतकात बांधलेले असण्याचा अंदाज आहे. या मंदिराच्या मंडपात दगडाच्या फ्लाेरिंगवर या खेळाचे अवशेष काेरलेले आहेत. हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गणित व मानविकी विज्ञान विभागाचे प्रा. डाॅ. आकाश गेडाम व राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाचे विभागप्रमुख डाॅ. प्रियदर्शी खाेब्रागडे यांच्यासह प्रा. प्रशांत ढेंगे, आर्किटेक्ट माेहिनी गजभिये, ॲड. गणेश हलकारे व विद्यार्थी समर बारसागडे यांच्या टीमने प्राचीन खेळांचा अभ्यास करताना बुद्धिजाळचे अवशेष शाेधून काढले आहेत. विशेष म्हणजे या पथकाला अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत सातपुडा पर्वतरांगामधील सातकुंड वनक्षेत्रात ‘मेंढागड’ परिसरात असलेल्या १७ लेण्यांपैकी तिसऱ्या लेणीमध्ये या खेळाचे अवशेष आढळले आहेत.
कसा आहे खेळ?
डाॅ. आकाश गेडाम यांनी माहिती देताना सांगितले, हा एक बाेर्डगेम (फलक खेळ) आहे. राजे, महाराजे, मंत्री लाकडाच्या बाेर्डवर हा खेळ खेळायचे तर कामगार, मजूर वर्ग जमिनीवर छिद्र करून या खेळाचा आनंद घ्यायचे. यामध्ये एक गाेल किंवा अधिकच्या चिन्हाच्या आकाराचा चाैकाेर फलक असताे व दाेन राेमध्ये छिद्र केले असतात. यात गाेट्या म्हणून छाेटे दगड, बिया किंवा कंचे यांचा वापर केला जाताे. खेळात २४, ३२ किंवा फलकानुसार गाेट्या असतात. समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. अशाेक बाेरकर यांच्या मते या खेळातून सामाजिक, आर्थिक व धार्मिक गाेष्टीही अधाेरेखित हाेतात. हा खेळ महाभारतातील चाैसर खेळाशीही साधर्म्य साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
फ्रान्सच्या १४ व्या लुईच्या दरबारात हाेता खेळ
बुद्धिजाळ हा नावाप्रमाणे बुद्धिचातुर्याचा खेळ आहे. भारतात हा खेळ ‘ब्रेनविटा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रिटेनमध्ये ‘साॅलिटेयर’ आणि अमेरिकेत ‘पेग साॅलिटेयर’ या नावाने ताे ओळखला जाताे. फ्रान्सचा राजा १४ वा लुई याच्या दरबारात हा खेळ खेळला जात असल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहेत. येथील राणी हा खेळ खेळतानाचे चित्रही प्रसिद्ध आहे. भारतात ४०० वर्षांपूर्वी मुघल काळात काश्मिरातून आलेले शिल्पकार उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये स्थायिक झाले व राेजीराेटीसाठी या खेळाचे फलक बनवायचे. नुकताच तामिळनाडूच्या वरुण के. या विद्यार्थ्याने २७ सेकंदात ब्रेनविटा हा खेळ पूर्ण करून ‘कलाम्स वर्ल्ड रेकार्ड’ मध्ये नाव नाेंदविल्याचे डाॅ. गेडाम यांनी नमूद केले.