फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडणारी टोळी सीसीटीव्हीवरून सापडली; चार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 05:56 PM2022-06-22T17:56:44+5:302022-06-22T18:00:30+5:30
११ ते १३ जून या कालावधीत अज्ञात चोरांनी कार्यालयाचे शटर तोडून ७ लाख १८ हजार रुपये रोख व चेकबुक चोरून नेले होते. यासंदर्भात त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता,व तपास सुरू केला होता.
नागपूर : मागील आठवड्यात वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नरेंद्र खानोरकर यांचे ऑरेंज नगर येथे भारत फायनान्शिअल इन्क्युजन लिमिटेड या नावाने कार्यालय असून, ११ ते १३ जून या कालावधीत अज्ञात चोरांनी कार्यालयाचे शटर तोडून ७ लाख १८ हजार रुपये रोख व चेकबुक चोरून नेले होते. यासंदर्भात त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता,व तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही वरून पोलिसांना चोरांचा सुगावा लागला. पोलिसांनी आणखी सखोल तपास केला, व चार आरोपींना अटक केली.
ताशुक अल्ताफ शेख (२३, हिवरी ले आऊट), आकाश नागरीकर (२३, जयदुर्गा नगर), जय गजभिये (२०, न्यू पँथर नगर), शुभम चुनोडे (२६, तुळशी नगर) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून २ लाख ४७ हजारांची रोख, तसेच दोन दुचाक्या, पाच मोबाइलसह ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपायुक्त नुरूल हसन व सहपोलीस आयुक्त पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस निरीक्षक हरीशकुमार बोराडे, हेमंत थोरात, दीपक तरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.