सरकार सकारात्मक, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणारच - आमदार प्रविण दरेकर
By मंगेश व्यवहारे | Published: December 12, 2023 10:28 AM2023-12-12T10:28:10+5:302023-12-12T10:28:37+5:30
आम्ही पण महापालिकेत शिवसेनेसोबत होतो, तेव्हा आमचीही चौकशी होईल, असे दरेकर म्हणाले.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मराठ्यांचा प्रश्न सोडविण्याचा संकल्प केला आहे. जरी मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असला तरी सरकार मराठ्यांच्या बाजूने असल्याने काळजी करण्याची गरज नाही. यातून गांभीर्याने मार्ग निघेल, असे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबई महापालिकेची ही चौकशी नसून पालिकेने केलेला विनियोग योग्य पद्धतीने झाला का याची पडताळणी आहे. आपण जशी आपल्या आरोग्याची तपासणी करतो तशी ही तपासणी आहे. आम्ही पण महापालिकेत शिवसेनेसोबत होतो, तेव्हा आमचीही चौकशी होईल, असे दरेकर म्हणाले.
२५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार
क्युरेटिव्ह पिटीशन हा सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे. त्यावर याचिकेवर मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे, बापट समितीच्या अहवालानुसार, मराठ्यांना आरक्षण मिळावे, असा निर्णय जवळपास झाला होता. मात्र, तत्कालीन राजकारण्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी दबाव टाकला होता. आता तशी स्थिती नाही. सभागृहाच्या कामकाजात मराठा आरक्षणावर विस्तृत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटेल, असा विश्वास मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.