धर्माच्या नावावर सरकार देशातील जनतेला धोका देतेय - मल्लिकार्जुन खरगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 12:22 PM2022-04-18T12:22:14+5:302022-04-18T12:22:44+5:30
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते.
नागपूर : सध्या देश दोनच लोक चालवत आहेत. या दोन लोकांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावला आहे. कोरोनाने लोकांचा रोजगार हिरावल्यामुळे पोटापाण्याचे संकट निर्माण झाले आहे. महागाईच्या भस्मासुराने गरिबांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण केला आहे. गरिबांना बरबाद करणारे हे सरकार केवळ धर्माच्या नावावर जनतेच्या भावनांशी खेळत असून, देशातील १३० कोटी लोकांना धोका देत असल्याचा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी येथे केला.
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत लिखित ‘आंबेडकर ऑन पाॅप्युलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी देशपांडे सभागृहात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून खरगे उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, विशेष अतिथी यूएसएच्या इंडियाना विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. केविन डी. ब्राऊन, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी एससी, एसटी, मायनॉरिटी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक के. राजू व तामिळनाडू विधानसभेतील काँग्रेसचे नेते सेल्वर पेरुंदगाई यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमागील संकल्पना सांगताना डॉ. राऊत म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार किती प्रगल्भ होते याची जाणीव या पुस्तकातून होते. १९३८ मध्येच बाबासाहेबांनी कुटुंब नियोजनाचे बिल सादर केले होते. त्यावेळी त्याचा प्रचंड विरोध झाला. वाढती लोकसंख्या गरिबीचे महत्त्वाचे कारण ठरू शकते हा विचार त्यांनी त्याकाळी मांडला होता. लोकसंख्येमुळे शेतीवरचा भार वाढेल, जमिनीचे तुकडे होतील आणि शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही, ही भूमिका त्यांची होती. आज नॅशनल सॅम्पल सर्व्हेनुसार ५१ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. बाबासाहेब भविष्यवेत्ता होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि उपाययोजना सुचविल्या. त्यामुळेच १९३८ ला मांडलेले लोकसंख्या नियंत्रणाचे बिल इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये अमलात आणले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित डॉ. ब्राऊन म्हणाले की, नागपूर असो, की महाराष्ट्र येथून बाबासाहेबांचा विचार या जगापर्यंत पोहोचविला. येथून बाबासाहेबांवर मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. बाबासाहेबांचे हे विचार अमेरिका, आफ्रिकेत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.
- प्रबोधनकारांचे विचार तरी कुटुंबीयांनी जोपासावेत
जाती-धर्माच्या भिंती मोडण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांसोबत काम केले. प्रबोधनकारांचा विचार आज त्यांच्याच कुटुंबातील लोक विसरले आहेत. ते चिथावणीखोर वक्तव्य करून जाती-धर्मात तेढ निर्माण करीत असल्याचा टोला खरगे यांनी राज ठाकरेंना लगावला.
भक्त बना, अंध भक्त बनू नका - मुख्यमंत्री
डॉ. बाबासाहेब हे ज्ञानाचा अथांग सागर. त्यांचे विचार हे देशासाठी पोषक आहेत. त्यामुळे बाबासाहेबांचे भक्त बनण्याची गरज आहे; पण आज अंध भक्तांचा सुळसुळाट झाला आहे. ते विनाकारण उधोउधो करीत फिरतात. हे भक्त कधीही आपले दैवत बदलवू शकतात. बाबासाहेबांवर श्रद्धा ठेवणारे कधीही अंध भक्ती करीत नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधताना व्यक्त केले.