सरकारने माझ्या मुलींची काळजी घ्यावी... ; लाभार्थी परिसंवादात नागपूरच्या महिलेची मुख्यमंत्र्यांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 08:40 PM2022-05-31T20:40:17+5:302022-05-31T20:41:05+5:30
Nagpur News सरकारने माझ्या दोन मुलींची काळजी घ्यावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील लाभार्थीने मुख्यमंत्र्यांना केली. आपल्या मुलीच्या शिक्षणाची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
नागपूर : शासनाने मला अनेक योजनांचा लाभ दिला आहे. घर, रोजगार, आरोग्य व जीवन जगायला मदत केली आहे. दुर्घटनेत घरचा कर्ता पुरुष कायमचा हरवला. अशा परिस्थितीत मुलींच्या भविष्याची चिंता सतावते. सरकारने माझ्या दोन मुलींची काळजी घ्यावी, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील लाभार्थीने मुख्यमंत्र्यांना केली. आपल्या मुलीच्या शिक्षणाची आम्ही काळजी घेऊ, शासन यापुढेही आपल्या पाठीशी असेल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या धर्तीवर शासनाने लाभार्थींसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. सकाळच्या सत्रात जिल्हा प्रशासनाचा कार्यक्रम सुरू झाला. दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रातिनिधिक लाभार्थींशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील संगीता रवींद्र टिकम, सुमन गडीराम दोनारकर, मीराबाई फुकट गणवीर या तीन लाभार्थींची बोलण्यासाठी निवड झाली होती. यापैकी संगीता टिकम यांनी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घरच्या परिस्थितीबाबत व रोजगाराच्या संधीविषयी चौकशी केली. त्यानंतर संगीता टिकम यांनी पती गेल्यामुळे दोन मुलींंची जबाबदारी शेतमजुरी करून होत नसल्याचे लक्षात आणून दिले. शासनाने घर, निवारा व आरोग्य याप्रमाणे मुलींची काळजी उचलावी व मदत करावी, असे आवाहन केले. निश्चितच शासन मदत करेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
त्यानंतर ऑनलाइन बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जनता जेव्हा मतदान करते त्यावेळी ते आपले भविष्य आणि आयुष्य आपल्या स्वाधीन करते. त्यामुळे केंद्राची असो वा राज्याची योजनेची अंमलबजावणी करणे शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. केंद्र व राज्य यांनी सर्व योजनांची १०० टक्के अंमलबजावणी केल्यास नागरिकांना उत्तम सोयीसुविधा दिल्या जाऊ शकतात. तिसऱ्या सत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिमाचल प्रदेशातील सिमला येथून संबोधित केले.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मीना, नागपूर सुधार प्रन्यासचे अतिरिक्त आयुक्त अविनाश कातडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे संचालक विवेक इलमे आदी उपस्थित होते.