दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनातील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत
By कमलेश वानखेडे | Updated: July 11, 2024 18:56 IST2024-07-11T18:56:20+5:302024-07-11T18:56:43+5:30
Nagpur : डॉ. नितीन राऊत यांची विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

The government should withdraw the crimes committed in the agitation at Dikshabhumi
नागपूर : दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्याला घेऊन १ जुलै ला उसळलेल्या गर्दीनंतर नागपूर पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दीक्षाभूमीवर झालेल्या आंदोलनानंतर बांधकाम साहित्याची तोडफोड आणि साहित्य जाळपोळ केल्याप्रकरणी नागपूरच्या बजाज नगर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहे. आंदोलक गुन्हेगार नाहीत त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवारी विधानसभेत केली.
राऊत म्हणाले, १ जुलै रोजी दीक्षाभूमी परिसरात झालेल्या घटनेतनंतर बजाजनगर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२५, १३२, १८९(२), १८९(५),१९०, १९१ (२), २९६, ३२६ (एफ), ३२६(जी) अंतर्गत गुन्हा पोलिसांनी दाखल केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांवर गुन्हा दखल करण्यात आले होते. हे विद्यार्थी शाळा आणि कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी असल्याने त्यांचा वरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
दीक्षाभूमी येथे पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे स्तूपाला धोका होईल, बोधिवृक्ष अडचणीत येईल त्यामुळे दीक्षाभूमी येथे भीमसैनिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलन केले होते. आंदोलन करणाऱ्या शेकडो ज्ञात-अज्ञात आंदोलकांवर पोलिसांनी गंभीर प्रकाराचे गुन्हे दाखल केले आहे. प्रकरणी आम्ही आंदोलन करणारे आहोत गुन्हेगार नाहीत, अशी बाजू त्यांनी मांडली.