दोन कोटी रोख द्या, बदल्यात ३.२० कोटी मिळतील; धान्य व्यापाऱ्याला आमिष दाखवून गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:19 AM2023-03-13T11:19:38+5:302023-03-13T11:20:49+5:30
‘हायप्रोफाइल’ प्रकरणात नऊ जणांविरोधात गुन्हा : चर्चित आसीफ रंगूनवालाचादेखील आरोपींमध्ये समावेश
नागपूर : नागपुरातील नऊ जणांनी मिळून वर्धा येथील एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूक करणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्याचे मित्रदेखील आहेत. दोन कोटी रोख दिल्यावर एक कंपनी ३.२० कोटी रुपये ऑनलाइन जमा करेल, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी नऊ जणांविरोधातदेखील गुन्हा नोंदविला असून यात कुख्यात आसीफ रंगूनवालाचादेखील समावेश आहे.
जॉय हरीभाई चंदाराणा (४९, हिंगणघाट, वर्धा) असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. चंदाराणा व शील देव यांना त्यांचे मित्र असलेले हितेश रेवतकर, जयंत वानखेडे, अविनाश भोरेकर यांनी संपर्क केला व ‘ट्रेड प्रॉफिट फंड’ (टीपीएफ) या कंपनीत जर दोन कोटी रोख गुंतविले तर कंपनी ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून ३.२० कोटी रुपये देईल, अशी त्यांनी बतावणी केली.
चंदाराणा व देव यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व प्रत्येकी एक कोटी रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दाखविली. तिघांनी सांगितल्याप्रमाणे चंदाराणा यांनी दोन कोटी रोख हे भालदारपुरा येथील आसीफ रंगूनवाला याच्या मालकीच्या रंगूनवाला बिल्डिंग येथील भगत ॲंड कंपनी येथे ८ मार्च रोजी आणून जमा केले. संबंधित कंपनी सत्येंद्र शुक्ला याने थाटली होती. गोडावूनला पैसे जमा करतो असे सांगून मेहूल मार्डिया ऊर्फ गणपत हा पैसे घेऊन गेला. मात्र, त्यानंतर कंपनीकडून बॅंक खात्यात पैसे न आल्याने चंदाराणा व देव यांनी रेवतकर, वानखेडे, भोरेकरला संपर्क केला. लवकरच पैसे जमा होतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, पैसे जमाच झाले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चंदाराणा यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आसीफ रंगूनवाला, सत्येंद्र शुक्ला, अविनाश भोरेकर, हितेश रेवतकर, जयंत वानखेडे, मेहूल मार्डिया ऊर्फ गणपत, कैलास ऊर्फ विलास नरवाडे, अजय अग्रवाल ऊर्फ सुलतान तहेखान, विवेक अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
ऑडिओ क्लिप अन् ‘दोन’चा ‘गेम’
चंदाराणा यांना पैसे देताना मनात थोडी शंका आली. मात्र, त्यांनी तिन्ही आरोपींवर विश्वास ठेवून रोख दोन कोटी रुपये दिले. कंपनीकडून पैसे परत मिळत नसल्याने ते बेचैन झाले असताना वानखेडेने कंपनीच्या मुंबई स्थित एजंट कैलास ऊर्फ विलास नरवाडे तसेच अजय अग्रवाल ऊर्फ सुलतान तहेखान यांना संपर्क साधून दोन्ही पीडित व्यापाऱ्यांना धीर देण्याचे नाटक केले. तसेच विवेक अग्रवाल याने चंदाराणा यांना फोन करून पैसे कुठेही जाणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, काही वेळानंतर चंदाराणा यांच्या मोबाइलवर आसीफ रंगूनवाला व सत्येंद्र शुक्ला यांच्यादरम्यान मोबाइलमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग प्राप्त झाले. त्यात दोन्ही आरोपी ‘चंदाराणाचा दोनचा गेम वाजवला’ असे बोलत होते.