अन् नातवाने आजीसमोरच घेतला अखेरचा श्वास; बेरोजगीच्या नैराश्यातून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 12:31 PM2022-12-13T12:31:12+5:302022-12-13T12:31:57+5:30
दोन वर्षांअगोदर गमावले होते आई-वडील
नागपूर : बेरोजगारीला कंटाळून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याने त्याच्या आजीसमोरच गळफास घेतलेल्या अवस्थेत अखेरचा श्वास घेतला. ऋषिकेश उर्फ ऋषी रवि मडावी (१९, रा. वैभवनगर, गिट्टीखदान) असे मृताचे नाव आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
ऋषीच्या आई-वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. ऋषीला बहीण व आजी आहे. बहीण मामाच्या घरी राहायची व ऋषी ७२ वर्षीय आजी सीताबाई यांच्यासोबत राहायचा. सीताबाई यांच्या पेन्शनवर घर चालायच्या. ऋषी कामाच्या शोधात होता, मात्र त्याला काम मिळत नव्हते. दहा दिवसांपूर्वी त्याचा वस्तीत वाद झाला होता व त्यानंतर त्याने दुचाकी पेटवून दिली होती. शनिवारी रात्री १० वाजता त्याने गळफास लावला.
तो गळफास लावत असताना त्याच्या आजीला टेबल पडण्याचा आवाज आला. त्यांनी मुख्य दरवाजा उघडून बाहेर पाहिले. त्यानंतर त्या आत आल्या असता त्यांना ऋषी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तो तडफडत होता व अखेरच्या घटका मोजत होता. त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलविले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. लोकांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडली. व्यथित होऊन आत्महत्या करत असल्याचे त्याने त्यात नमूद केले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आजीचा आधार गेला
सीताबाई यांचा मुलगा व सून यांचे दोन वर्षांअगोदर निधन झाले होते. त्यानंतर नातू ऋषी याच्यासोबत त्या राहायच्या. मात्र, आता नातूदेखील गेल्याने त्या एकट्या पडल्या आहेत.