पाहुणे आले, 'ती' मात्र नटलीच नाही; नागपूरच्या साैंदर्याला नजर लागल्यासारखे झालेय
By नरेश डोंगरे | Published: December 7, 2023 08:39 PM2023-12-07T20:39:10+5:302023-12-07T20:40:23+5:30
गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे साैंदर्याची भूरळ घालणाऱ्या या नगरीत आज ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू झाले. मात्र, यंदा नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाची चर्चा नव्हे तर तुलना चर्चेला आली आहे.
- नरेश डोंंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाहुणे कुठलेही असू देत, ते आले अन् त्यांनी तिला बघितले की तिच्या साैंदर्यावर भाळल्याशिवाय ते राहात नव्हते. 'तिच्या' प्रेमात पडलेली गावोगावची मंडळी तिच्या साैंदर्याची चर्चा आपापल्या मित्रमंडळीत वर्षभर करायचे. यंदा मात्र विकासाच्या नावाखाली मिळालेल्या अतिरिक्त 'डोज'मुळे म्हणा की आणखी काही, 'तिच्या' साैंदर्याला नजर लागल्यासारखे झाले आहे. होय, आज ते प्रकर्षाने जाणवत आहे. गोष्ट आहे, देखण्या नागपूर नगरीच्या साैंदर्याची!
हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले की दरवर्षी अधिवेशन सुरू होण्याच्या महिन्याभरापूर्वीच नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाला प्रारंभ व्हायचा. रस्ते गुळगुळीत व्हायचे, फुटपाथच्या टाईल्स बदलल्या जायच्या, जुन्या टाईल्सवर वॉटर पेंट केला जायचा. आजुबाजूचा केरकचरा फेकला जायचा अन् छान रस्त्याच्या दुभाजकाला अन् फुटपाथला रंग-पेंट मारला जायचा. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वीच्या रात्रीपर्यंत शहराच्या विविध भागात साैंदर्यीकरणाची कामे सुरू असायची. त्यामुळे अधिवेशनाच्या वेळी नागपूर नगरी एखाद्या नववधूसारखी नटून थटून पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे भासायचे. उपराजधानीचे हे साैंदर्यीकरण, देखणेपण अधिवेशनाच्या निमित्ताने येणाऱ्या राज्यभरातील ठिकठकिणाच्या आम-खास पाहुण्यांच्या आकर्षणाचा अन् चर्चेचाही विषय ठरायचे. नागपूर नगरी किती सुंदर आहे, त्याबाबत सारेच चर्चा करायचे. आपल्या मित्रमंडळींना सांगायचे. या नगरीत आपलेही एखादे निवासस्थान असावे, असेही अनेकांना मनोमन वाटून जायचे.
गेल्या अनेक वर्षांपासूनच अशा प्रकारे साैंदर्याची भूरळ घालणाऱ्या या नगरीत आज ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू झाले. मात्र, यंदा नागपूर नगरीच्या साैंदर्यीकरणाची चर्चा नव्हे तर तुलना चर्चेला आली आहे. कारण उपराजधानीतील सिमेंटचे प्रशस्त चकचकीत रस्ते, मेट्रो, पुलं, दिसत असले तरी यावेळी शहराच्या विविध भागात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांचे अडथळेसुद्धा दिसत आहेत. जेथे-कुठे अडथळे नाही, अशा अनेक भागात रंगरंगोटीच झालेली नाही. उड्डाणपुलाच्या भिंतीवर रोपटे अन् खाली झुडपे उगवली आहेत.
उड्डाणपुलावर झाडं, खाली घाण -कचरा
व्हीव्हीआयपीच्या आगमनाचा मार्ग असलेल्या लोकमत चाैक ते विमानतळ मार्गावरील रस्त्याचे उदहारण त्यासाठी पुरेसे ठरावे. जुन्या रहाटे आणि आताच्या कृपलानी चाैकातील दुभाजकांनाही काळा-पिवळा पेंट मारण्याची तसदी यावेळी घेण्यात आलेली नाही. हेच काय, रस्त्याच्या दुतर्फा घाणेरड्या झालेल्या फुटपाथवर कचरा आहे अन् रंगरंगोटी सोडा. जागोजाी उखडलेल्या, फुटलेल्या टाईल्सही दुरूस्त करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा मार्ग सुंदर नाही तर भकास भासतो आहे.
कॉस्टकटिंग की आणखी काही ?
विकासाची अनेक कामे झालेल्या उपराजधानीला गेल्या वर्षी जी-२० च्या निमित्ताने नववधूसारखे सजविण्यात आले होते. तेव्हा साैंदर्यीकरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे यंदा अधिवेशनाच्या वेळी साैंदर्यीकरणावर हात आखुडता घेण्यात आला असावा, असा तर्क लावला जात आहे. तर, हा कॉस्ट कटिंगचा प्रकार असावा, असाही अंदाज वर्तविला जात आहे.