शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापक जबाबदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 07:03 PM2022-02-25T19:03:58+5:302022-02-25T19:04:29+5:30

Nagpur News शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील सुयश कॉन्व्हेंट प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

The headmaster is not responsible if the teacher beats the students | शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापक जबाबदार नाही

शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापक जबाबदार नाही

Next
ठळक मुद्देसुयश कॉन्व्हेंट प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

नागपूर : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील सुयश कॉन्व्हेंट प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण करणारे नृत्य शिक्षक मनीष राऊत व मुख्याध्यापक अनुराग पांडे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ (शस्त्राने दुखापत करणे) व बाल न्याय कायद्यातील कलम ७५ (बालकांसोबत क्रूरता) अंतर्गत गुन्हा नोंदवून १८ एप्रिल २०१७ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. उच्च न्यायालयाने पांडे यांचा या दोन्ही गुन्ह्यांत समावेश केला जाऊ शकत नसल्याचे सांगून त्यांना आरोपमुक्त केले.

पांडे शाळेचे मुख्याध्यापक असले तरी पीडित विद्यार्थी त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली किंवा ताब्यात नव्हते. नृत्य शिक्षक मनीष राऊत विद्यार्थ्यांना शिकवित होते. विद्यार्थ्यांवर राऊत यांचे प्रत्यक्ष नियंत्रण होते. दरम्यान, राऊत यांनी विद्यार्थ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी पांडे वर्गाजवळही नव्हते. त्यांनी विद्यार्थ्यांना हात लावला नाही किंवा राऊत यांच्या कृतीचे समर्थन केले नाही. साक्षीदारांच्या बयाणातदेखील पांडे यांच्यावर काहीच आरोप करण्यात आले नाही, या मुद्यांकडे हा निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. ही घटना ३० नोव्हेंबर २०१६ रोजी घडली होती. त्यानंतर पालक अरुणा खंडाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पांडे यांच्या वतीने ॲड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: The headmaster is not responsible if the teacher beats the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.