ऊन तापू लागले, पारा ३५.८ अंशांवर पोहोचला; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 09:52 PM2023-02-10T21:52:56+5:302023-02-10T21:53:26+5:30
Nagpur News फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य तापू लागला आहे. गेल्या २४ तासात नागपूरचे तापमान २.९ अंशांनी वाढून ३५.८ अंशांवर पोहोचले आहे.
नागपूर : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य तापू लागला आहे. गेल्या २४ तासात नागपूरचे तापमान २.९ अंशांनी वाढून ३५.८ अंशांवर पोहोचले आहे. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी जास्त राहिले. सुमारे तीन महिन्यांनंतर पारा ३५ अंशावर गेला आहे. हवामान खात्यानुसार, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून आणखी तापमान वाढण्यास सुरुवात होईल.
१४ फेब्रुवारीनंतर नवा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ तयार होईल. यामुळे नागपूरसह विदर्भाच्या तापमानात वाढ होईल. शुक्रवारी दिवसभर सूर्य तापला. सकाळी हवेतील आर्द्रता ४० टक्के होती. सायंकाळी ती २८ टक्क्यांपर्यंत आली. किमान तापमान १२.२ अंश राहिले. सूर्यास्तानंतर काहिसी थंडी जाणवली.
विदर्भात अकोला ३७.३ अंशांसह सर्वाधिक गरम राहिले. वर्धा (३६.७ अंश) अमरावती (३६.२ अंश), यवतमाळ (३५ अंश), वाशिम (३४.८ अंश) तापमानाची नोंद झाली. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दिवसाच्या तुलनेत रात्रीचे तापमान एक तृतीयांशपर्यंत खाली येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारीत सर्वाधिक ३९.२ अंश तापमानाची नोंद
- फेब्रुवारी महिन्यात नागपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद २४ फेब्रुवारी २००६ रोजी झाली होती. या दिवशी किमान तापमान ३९.२ अंशावर पोहोचले होते. गेल्या दहा वर्षात २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पारा ३७.८ अंशांवर पोहोचला होता. २०१६, २०१९ व २०१२ मध्ये फेब्रुवारीत पारा ३७ अंशांपर्यंत पोहोचला. या फेब्रुवारीतही पारा तेवढीच मजल मारण्याची शक्यता आहे.