उन्हाचा तडाखा वाढला; तुमच्या प्राण्यांना सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 08:02 PM2023-05-13T20:02:16+5:302023-05-13T20:02:58+5:30
सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य आहे.
नागपूर : प्राण्यांच्या अंगावर घामाच्या ग्रंथी नसतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान घामावाटे कमी होत नाही. तोंडाद्वारे ते हाफतात, शरीराला थंड करण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या उन्हाळा इतका तडकला आहे की प्राण्यांना हिटस्ट्रोक, डिहायड्रेशन होऊ शकते. नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात लोकांकडे विदेशी जातीचे प्राणी आहेत. या प्राण्यांसाठी नागपूरची हिट असह्य ठरत आहे.
काळ्या रंगाच्या प्राण्यांना हिटस्ट्रोकचा जास्त धोका असतो. चपट्या नाकाचा पग, बुलडॉग, पेकीनिज या जातीच्या कुत्र्यांना उष्णता वाढली तर सनस्ट्रोक होतो. लठ्ठ जातीचे कुत्रे लॅब्राडोर, गोल्डन रेट्रीव्हर, रॉट व्हीलर, पिगल हाऊंट, पग, सेन बर्नाड, ग्रेट डेन ही कुत्री उन्हाळ्यात अस्वस्थ होतात. जोरजोरात भूंकतात, जोरात हाफतात. जर्मन शेफर्ड कुत्र्यांना तर ऊन सहन होत नाही.
त्याचबरोबर पर्शियन मांजर, देशी मांजरी, सयामिज, ब्रिटिश शॉर्ट हेअर, हिमालयन कॅट या जातीच्या मांजरीसाठी उन्हाळा घातक असतो. घरी पाळणारे पोपट, लव्हबर्ड, काकाटील, रंगीबेरंगी चिमण्या हिटस्ट्रोकमुळे मरू शकतात.
-सनस्ट्रोक होण्याची कारणे
प्राणी आजारी असेल, खातपीत नसेल, पाण्याचे प्रमाण कमी झाले असेल, इम्युनिटी पॉवर कमी असेल, उन्हात रस्त्यावर फिरविल्याने, अंगावर केस जास्त असले तरी सनस्ट्रोक होऊ शकतो.
- लक्षणे
शरीराचे तापमान १०५ डिग्रीवर अचानक जाते, नाकातून तोंडातून रक्तस्त्राव होणे, १०७ च्यावर तापमान गेल्यास गुद्वारातून रक्त येते, कुत्रा धापा टाकतो, तोंडातून लाळ गळतो, जमिनीवर आडवा पडून राहतो, डोळे फिरवितो, उठू शकत नाही.
- प्राण्यांना सावलीत ठेवावे, २४ तास थंड पाणी जवळ ठेवावे. खाण्यात दही भात, दही पोळी, ज्युस फळ, ग्लुकोज इलेक्ट्रॉलचा वापर करावा. कुल्फी, आइस्क्रीम, आंब्याचे पन व नारळाचे पाणी कुत्रा मांजरांना देता येते. सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने आंघोळ, सकाळी ७ पर्यंत रात्री ८ नंतरच फिरायला बाहेर काढावे. पाणी जास्त पाजावे.
लोकं ताप उतरविण्यासाठी स्वत:च्या मनाने औषधी देतात, ते देऊ नये त्यामुळे ह्रदयविकाराचा धोका होऊ शकतो.
डॉ. हेमंत जैन, पशुचिकित्सक