भयावह घटना टळली; उपमुख्यमंत्री उठून गेले अन् व्हीव्हीआयपी लाऊंजमध्ये शॉर्ट सर्किट झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 08:57 PM2023-04-15T20:57:24+5:302023-04-15T21:24:08+5:30
Nagpur News महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून होते, ते मंचावर गेल्याच्या काही मिनिटांनंतरच तेथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा थरार निर्माण झाला.
नरेश डोंगरे
नागपूर : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) ने आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून होते, ते मंचावर गेल्याच्या काही मिनिटांनंतरच तेथे शॉर्ट सर्किटमुळे मोठा थरार निर्माण झाला. वेळीच उपाययोजना करून संभाव्य दुर्घटना रोखण्यात आली. अजनीच्या रेल्वे मेन्स स्कूलजवळ शनिवारी सकाळी महारेलतर्फे आयोजित कार्यक्रमात हा गंभीर प्रकार घडला. यामुळे महारेलच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.
महारेलच्या वतिने शनिवारी सकाळी ९ वाजता ठिकठिकाणच्या सहा विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि अजनी रेल्वे पुलासह सहा ठिकाणच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भव्य-दिव्य शामियाना अन् साजेसा मंच उभारण्यात आला होता. पाहुण्यांसाठी मंचाच्या उजव्या बाजूला तात्पुरते व्हीव्हीआयपी लाऊंज तयार करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आजी-माजी खासदार, आमदारांनी ९ वाजता पासूनच हजेरी लावणे सुरू केले. ९: ३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी आले. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यायला उशिर होता. त्यामुळे उपस्थितांना नमस्कार करत करत फडणवीस व्हीव्हीआयपी लाऊंजमध्ये गेले. तेथे ते निवडक सहकाऱ्यांसह बराच वेळ बसले. काही वेळेनंतर गडकरी यांचे आगमन झाल्याने फडणवीस लाऊंजमधून उठून मंचावर गेले. त्याच्या वीसएक मिनिटानंतर (१०:१५ वाजता) व्हीआयपी लाऊंजमधून वेगळाच कडकडाट ऐकू येऊ लागला. 'शॉर्ट सर्किट'मुळे ठिणग्या उडाल्या अन् एकच धावपळ माजली. साधारणत: एक ते दोन मिनिटे ठिणग्यांचा थरथराट सुरू होता. परिणामी तेथे गोंधळ निर्माण झाला. सुरक्षा रक्षक, रेल्वेचे अधिकारी धावले. अग्निशमन उपकरणाचा वापर झाला अन् पुन्हा जैसे थे' स्थिती झाली. तासाभरानंतर कार्यक्रम संपला मात्र एवढ्या चांगल्या कार्यक्रमस्थळी घडलेली ही घटना महारेलच्या अधिकाऱ्यांना धडकी भरविणारी ठरली.
... तर काय गहजब झाला असता ?
उपमुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळी तेथे बसून होते, त्यावेळी ही घटना घडली असती तर काय गहजब झाला असता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यावर आता चर्चाही सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, वरकरणी हा प्रकार किरकोळ वाटत असला तरी त्याची गंभीर दखल घेतली गेल्यास कार्यक्रम आयोजनाशी संबंधित असलेल्या काहींना मोठी किंमत चुकवावी लागू शकते, अशीही चर्चा आहे.