भुकेने व्याकूळ भीक मागणारे वाढले, हॉटेलात रोज १५ टन अन्नाची नासाडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 12:57 PM2023-11-13T12:57:14+5:302023-11-13T13:00:10+5:30
वेदनादायी वास्तव : भुकेपोटी भीक मागणाऱ्यांच्याही संख्येत वाढ
नागपूर : शहरातील चौकांमध्ये, मंदिर, दर्गा, मस्जिदीपुढे भुकेपोटी भीक मागणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. तर दुसरीकडे शहरातील हॉटेल्समधून उरलेले, शिळे १५ टन अन्न कचऱ्यामध्ये दररोज टाकावे लागते. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दररोज सकाळी हॉटेलमधूनअन्न गोळा केले जाते. जे भांडेवाडीत टाकले जाते. त्यातून हे वेदनादायी वास्तव पुढे आले आहे.
महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कचरा गाड्या दररोज सकाळी शहरातील हॉटेल्समधील ‘कचरा’ गोळा करायला बाहेर पडतात. त्यांच्याकडे गोळा होणाऱ्या अन्नामध्ये अर्धवट टाकून दिलेल्या चपात्यांच्या राशी, शिल्लक राहिलेले भाताचे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याणीचे ढीग, ग्राहकांनी ताटातच शिल्लक ठेवून दिलेल्या मांसाहारी आणि शाकाहारी भाज्या, कांदा-लिंबू, मुळा, बीट आणि गाजराचे तुकडे असे सारे अन्नाचे प्रकार या कचऱ्यात बघायला मिळतात.
तर दुसरीकडे शहरात फेरफटका मारल्यावर वेदनादायी चित्रही बघायला मिळते. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी अनेक जण एकवेळच्या अन्नालाही महाग आहेत. भुकेपोटी भीक मागणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. गोरगरिबांच्या वस्त्यांमधून कोंड्याचा मांडा करून गुजराण सुरू आहे. मात्र, त्याचवेेळी शहरात दररोज कित्येक टन अन्नाची अक्षरश: माती होताना दिसत आहे.
नागपूर शहरात ५०० वर हॉटेल
शहरात नोंदणीकृत हॉटेलांची संख्या ५०० च्यावर आहे. हॉटेल्सशिवाय खास सावजी जेेवणासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शंभरभर खासगी खानावळीही आहेत. याशिवाय रस्त्या-रस्त्यांवर दिसणारी छोटी-मोठी हॉटेल्स वेगळीच. जेवणाच्या बाबतीत नागपूरची स्वत:ची अशी एक खासियत आहे. या हॉटेल्स आणि खानावळींमधून दररोज एक ते दीड लाखांहून अधिक लोक जेवण करतात. तेवढ्याच मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीही होते. कचरा डेपोकडे धावणारे अन्नाचे कचऱ्याचे ट्रक बघितल्यानंतर संवेदनशील माणसाच्या मनाला तडे गेल्याशिवाय राहत नाहीत.