वादळाचा तडाखा! भिंतींच्या ढिगाऱ्यात दबून मायलेकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 11:23 AM2023-04-21T11:23:02+5:302023-04-21T11:23:25+5:30
झाडे कोसळली, विद्युत खांब पडले, वीजपुरवठा खंडित, अनेक वस्त्या मध्यरात्रीनंतरही काळोखात
नागपूर : गुरुवारी सायंकाळी वादळवाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागपूर शहरासह जिल्ह्याला मोठा तडाखा बसला. वादळामुळे नागपूर शहरातील अनेक भागात झाडे रस्त्यावर कोसळली. वीजपुरवठा खंडित होऊन अनेक वस्त्या अंधारात बुडाल्या. सदर, बैरामजी टाउन, गोंडवाना चौकातील जे. पी. हाइट्स बिल्डिंगची सुरक्षा भिंत वादळामुळे पडली. या भिंतीला लागून असलेल्या झोपडीतील मायलेकाचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली.
जे. पी. हाइट्स बिल्डिंगच्या सुरक्षा भिंतीला लागून अशोक यादव यांचे घर आहे. भिंत कोसळल्यामुळे पत्नी ज्योती व मुलगा अमन याचा मृत्यू झाला. अशोक व त्यांचा दुसरा मुलगा हे घटनेच्यावेळी बाहेर गेले असल्यामुळे बचावले. हवामान विभागाने गुरुवारी गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा दिला हाेता. ढगाळ वातावरणामुळे पारा कमी झाला असला तरी उन्हाचे चटके व उकाड्याने नागरिक त्रासले हाेते. सायंकाळी मात्र अचानक वातावरण बदलले. विजांसह मेघगर्जना सुरू झाली. जाेराच्या वादळवाऱ्यासह पाऊस झाला. लक्ष्मीनगर, देवनगर, बजाजनगर, माटे चाैक, दीक्षाभूमी ते नीरी राेडवरील अनेक लहान-माेठी झाडे रस्त्यावर काेसळली. खामल्यात घरासमोर लावलेल्या कारवर झाड कोसळले. धरमपेठ महिला बँकेजवळ झाड पडल्यामुळे बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले आहे. भगवती हॉलजवळ बऱ्याच ठिकाणी झाडे पडली. वसंत नगर, बजाज नगर पोलिस स्टेशनच्या मागे तीन झाडे कोसळली. भगवाननगर व आसपासच्या परिसरात घरावरील टीनपत्रे उडाल्याची माहिती आहे. उत्तर नागपुरातही वादळाचा तडाखा बसला. काही ठिकाणी वाहनांवर झाडे पडल्याची माहिती आहे.
नागरिक आक्रमक, अजनीत पोलिस बंदोबस्त
विवेकानंदनगरचा काही भाग, सावरकरनगर, संताजी काॅलनी, रामकृष्णनगर व जवळपासच्या भागात वीजपुरवठा खंडित झाला. अजनी चौक येथील महावितरणच्या कार्यालयात ४० ते ५० लोक तक्रार घेऊन पोहोचले. कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे महावितरणची दाणादाण उडाली. यावेळी तणाव वाढू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बत्ती गुल, नागरिक त्रस्त, महावितरणची तारांबळ
अनेक भागात तारांवर झाडे पडल्याने विद्युत तारा तुटल्या व विजेचे खांब खाली वाकले. त्यामुळे प्रतापनगर, जयताळा, मेंढे ले-आऊट, सहकारनगर, खामला, गाेपालनगर, अभ्यंकरनगर, इंद्रप्रस्थनगर हा पश्चिम नागपूरचा पूर्ण भाग अंधारात गेला हाेता. मनीषनगर, इंदोरा, श्रीनगर, नरेंद्रनगर, काटोल रोड, मानेवाडा, ज्ञानेश्वरनगर, सक्करदरा, अंबिकानगर, दिघाेरी आदी परिसरातही अंधार पसरला हाेता. मध्यरात्रीनंतरही शहरातील अनेक वस्त्यात वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
वाहतूक विस्कटली
अचानक सुरू झालेल्या वादळी पावसामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक चाैकांतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. बहुतेक चाैकांमध्ये सैरभैर वातावरण हाेते. वादळी वाऱ्यामुळे देवनगर, श्रीनगर, छत्रपती चौक, खामला, दीक्षाभूमी, इंदोरा चौक, नरेंद्रनगर यासह शहराच्या विविध भागात झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
गारपिटीमुळेगहू, भाज्या, फळबागांचे माेठे नुकसान
जिल्ह्यातील अनेक भागातही वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. सर्वाधिक नुकसान नरखेड व हिंगणा तालुक्यात झाले. नरखेडच्या जलालखेडा, खडकी, मुक्तापूर, मदना, भारसिंगी, चांदणीबर्डी, मेहद्री, खेडी खरबडी, मेंढला, सिंजर, दातेवाडी, वडविहरा, करणंजोली, थडीपवणी, अंबाडा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. वादळ व गारपिटीमुळे शेतातील गहू जमीनदोस्त झाला, तर भाजीपाल्याचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले. आंब्याच्या बागांनाही माेठा फटका बसला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. दुसरीकडे हिंगणा तालुक्यातही अवकाळी पाऊस व वादळाचा फटका बसला. हिंगणा मार्गाशेजारी असलेली छोटी दुकाने, पान टपऱ्या, भाजीपाल्याची दुकाने व झोपड्यांची पडझड झाली. रस्त्याशेजारी फुटपाथवर दुकानाचे छप्पर उडून हिंगणा मार्गावर आल्याने सूतगिरणीजवळ बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळामुळे झाडे काेसळली तसेच विद्युत खांब व तारा तुटल्यामुळे अनेक गावे सकाळपर्यंत अंधारात दडली हाेती.