महामार्ग नव्हे, शहरातील अंतर्गत मार्गच ठरताहेत ‘मृत्यूचे सापळे’; वेगाचा मोह पडतोय जीवाला भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 07:00 AM2022-06-09T07:00:00+5:302022-06-09T07:00:06+5:30

Nagpur News नागपुरातील ६४ टक्क्यांहून अधिक अपघात हे अंतर्गत मार्गांवरील होते. त्यातही दुचाकीवरील वेगाचा मोह जीवघेणा ठरत असल्याचे चित्र आहे.

The inner city roads, not the highways, are the 'death traps'; The temptation of speed is heavy on the soul | महामार्ग नव्हे, शहरातील अंतर्गत मार्गच ठरताहेत ‘मृत्यूचे सापळे’; वेगाचा मोह पडतोय जीवाला भारी

महामार्ग नव्हे, शहरातील अंतर्गत मार्गच ठरताहेत ‘मृत्यूचे सापळे’; वेगाचा मोह पडतोय जीवाला भारी

Next
ठळक मुद्दे६४ टक्के अपघात अंतर्गत मार्गांवर

 

योगेश पांडे

नागपूर : २०२२ मधील पहिल्या पाच महिन्यांत नागपुरात ४३५ अपघात झाले. एरवी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर जास्त अपघात होतात, असा समज आहे. परंतु नागपुरातील ६४ टक्क्यांहून अधिक अपघात हे अंतर्गत मार्गांवरील होते. त्यातही दुचाकीवरील वेगाचा मोह जीवघेणा ठरत असल्याचे चित्र आहे. पाच महिन्यांत १४५ दुचाकीस्वारांचे अपघात झाले व एकूण अपघातांच्या तुलनेत ही टक्केवारी ३३ टक्के इतकी आहे.

नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर अनुक्रमे १४१ व १४ अपघात झाले. मात्र शहरातील इतर रस्ते व प्रामुख्याने अंतर्गत रस्त्यांवर २८० अपघात झाले. जानेवारी ते मे या कालावधीत १३१ प्राणांतिक अपघात झाले. त्यातील ६७ अपघात अंतर्गत रस्त्यांवरील होते व त्यात ६८ जणांचा बळी गेला. तर महामार्गांवर ५६ अपघातांत ६३ जणांनी जीव गमाविला.

दुचाकी ‘स्लिप’ झाल्याने अनेकांचा बळी

बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले. त्यातही रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार हेल्मेट न घालता आपले वाहने बेदरकारपणे चालवितात. शहरातील बरेच अंतर्गत मार्ग व सीमेवरील भागांमध्ये अनेकांची वाहने घसरतात. वेग जास्त असला की अनेक जण अशा अपघातात गंभीर जखमी होतात व वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही की त्यांचा मृत्यू होतो. दुचाकीस्वारांनी वेग नियंत्रित ठेवत हेल्मेटचा वापर करायलाच हवा.

-सारंग आवाड, उपायुक्त, वाहतूक शाखा, नागपूर पोलीस

‘ट्रक’ सर्वात धोकादायक

पाच महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त प्राणांतिक अपघात ट्रकमुळे झाले आहेत. ट्रक्समुळे ३५८६ अपघात झाले व ४६ नागरिकांचा बळी गेला. तर दुचाकींचे १४५ अपघात झाले व त्यात ३२ जणांचा जीव गेला. कारमुळे १३६ अपघात झाले व २२ जणांना जीव गमवावा लागला. शहरात झालेल्या अपघातांपैकी तब्बल ३३ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचे होते.

 

Web Title: The inner city roads, not the highways, are the 'death traps'; The temptation of speed is heavy on the soul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात