५३ वर्षीय महिलेची जिद्द; ज्या दिवशी मुलाला गमावले त्याच्या प्रथम स्मृतीदिनी दिला गोंडस बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 07:35 AM2022-04-17T07:35:00+5:302022-04-17T07:35:01+5:30
Nagpur News कोरोनात आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या महिलेने त्याच्या प्रथम दिनाच्या एक दिवस आधी एका गोंडस बाळाला जन्म दिला.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनामुळे अनेकांचे हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्या माऊलीनेही आपल्या २७ वर्षीय मुलाला गमावले. कित्येक दिवस ती मुलाच्या दु:खात होती. कोरोनाविषयी तिच्या मनात प्रचंड चीड होती. एक दिवस कोरोनालाच हरविण्याच्या जिद्दीने ती उठली. थेट हॉस्पिटल गाठले. मला पुन्हा मूल हवे असल्याचे सांगत डॉक्टरांचे पायच धरले. तिची इच्छाशक्ती पाहून डॉक्टरांनी उपचाराला सुरुवात केली आणि ५३ वर्षीय ती माऊली पुन्हा आई झाली. मुलगा गमावल्याच्या ठिक एक दिवस आधी १४ एप्रिल रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
नागपूरची रहिवासी असलेली मंदाकिनी विनोद मानके त्या आईचे नाव. तिचा एकुलता एक मुलगा अक्षयला कोरोना झाल्याचे निदान होताच तिने आवश्यक सर्व उपचार केले. परंतु १५ एप्रिल २०२१ रोजी अक्षयने शेवटचा श्वास घेतला. तिचे मनोधैर्य खचले. काही करा माझ्या मुलाला परत आणा हा तिचा हट्ट अनेक दिवस होता. कुटुंबातील सदस्यांनी समजावून पाहिले. परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. पुढे ती अबोलीच झाली. अचानक एक दिवस ती घराबाहेर पडली. तिने स्वत:शीच या जगात मुलाला परत आणण्याचा संकल्प केला. वंध्यत्व आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. संगीता ताजपुरिया यांच्याकडे गेली. मला पुन्हा आई व्हायचे आहे असे सांगत कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय उपचाराला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. तिची अडीच वर्षांपूर्वीच रजोनिवृत्ती झाली होती. पती विनोद एक निवृत्त शिक्षक, त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. परंतु ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तिची जिद्द पाहून डॉ. ताजपुरिया यांनी उपचाराला सुरुवात केली. मासिक पाळी पुन्हा येण्याची योजना आखली. पण मंदाकिनीने जुलै महिन्यातच ‘आयव्हीएफ’ करण्याचा आग्रह धरला. डॉक्टरांनी घाई न करण्याचा सल्ला दिला. परंतु तिने आणि तिच्या कुटुंबाने या मागचे कारण सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी ‘आयव्हीएफ’ केले. ऑगस्ट महिन्यात ती गर्भवती राहिली, तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अक्षयच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधीच १४ एप्रिल २०२२ रोजी ती पुन्हा आई झाली.
-तिची इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारामुळेच ती आई होऊ शकली
‘लोकमत’शी बोलताना डॉ. ताजपुरिया म्हणाल्या, मंदाकिनी ही आरोग्य दृष्टीने फिट असल्याचे चाचणीतून पुढे आल्यावरच उपचाराला सुरूवात केली. औषधाने तिची मासिक पाळी सुरू केली. ‘आयव्हीएफ’ उपचाराने गर्भधारणा झाली. तिचा प्रसूतीचा दिवस २५ एप्रिल २०२२ होता. परंतु तिने प्रसूतीची तारीख ठरवून ठेवली होती. २५ मार्च रोजी तिची तपासणी केली असता तिच्या गर्भातील पाणी कमी झाले होते. सोबतच नाळ बाळाच्या गळ्याभोवती आल्याचे दिसून आले. यामुळे त्या दिवसापासून तिच्याशी फोनवरून संवाद साधत होते. आठवड्यातून एकदा तिला रुग्णालयात बोलावून तपासत होते. १३ एप्रिल २०२२ रोजी ती रुग्णालयात आली, आणि १४ एप्रिल रोजी सिझर झाले. तिची इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचारामुळेच ती पुन्हा आई होऊ शकली.
-७७ वर्षीय आजीलाही झाला आनंद
मंदाकिनीच्या ७७वर्षीय आईला आपली मुलगी पुन्हा आई होणार असल्याचे लक्षात आल्यावर तिने पहिल्या बाळांतपणासाठी जेवढे कष्ट घेतले नसतील त्याच्या दुप्पट कष्ट वयाचा विचार न करता तिने आपल्या मुलीसाठी घेतले. पुन्हा आजी झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता.