‘त्या’ बालिकेच्या प्रकरणाचा तपास अखेर महिला अधिकाऱ्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:09 PM2023-09-13T12:09:31+5:302023-09-13T12:09:41+5:30
बेसातील दहा वर्षीय मुलावरील अत्याचाराचे प्रकरण
नागपूर : घरकामाच्या नावाखाली १० वर्षांच्या मुलीकडून अक्षरश: वेठबिगारी करवून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास नियमांनुसार महिला अधिकाऱ्याकडे न देता पुरुष अधिकाऱ्याकडेच होता. यावरून बरेच वादंग झाल्यावर आता अखेर हुडकेश्वरचे ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांच्याकडून तपास काढण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत.
अथर्वनगरीत अरमान खान याच्या घरात २०२० सालापासून नरकमय जीवन जगणाऱ्या मुलीचे प्रकरण २९ ऑगस्ट रोजी समोर आले. अरमानची पत्नी हिना व मेहुणा अजहर हेदेखील तिला मारहाण करायचे व अजहर-अरमानने तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले. पोलिसांनी या प्रकरणात ३१ ऑगस्ट रोजी अरमानला अटक केली. त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली, तर अरमानचा मेहुणा अजहर यालाही सोमवारी अटक करण्यात आली. हिना खानचा शोध अद्यापही सुरू आहे.
या प्रकरणात आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंटचा मुद्दा चांगलाच गाजला व उपनिरीक्षक बाळू राठोडला निलंबित करण्यात आले. नियमानुसार लहान मुलीचा विषय असल्याने महिला पोलिस अधिकाऱ्याकडे तपास सोपविणे अपेक्षित होते. मात्र, महिला अधिकाऱ्यावर अगोदरच कामाचा फार ताण असल्याचे कारण देत तो तपास ठाणेदार राजपूत यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यावरून नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनदेखील देण्यात आले. त्यानंतर मंगळवारी राजपूत यांच्याकडून तपास काढत गुन्हे शाखेच्या रेखा संकपाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.